जाहिरात प्रकरण भोवणार
By admin | Published: October 5, 2016 01:17 AM2016-10-05T01:17:47+5:302016-10-05T01:17:47+5:30
तिरोडा तालुका कृषी विभागाने आय.डब्ल्यू.एम.पी.-२ अंतर्गत २४ गावांमध्ये मूत्रीघर बांधण्याचे उपक्रम
मंडळ कृषी अधिकाऱ्याचा प्रताप : तक्रारीवरून तिरोडा पोलिसांची चौकशी
काचेवानी : तिरोडा तालुका कृषी विभागाने आय.डब्ल्यू.एम.पी.-२ अंतर्गत २४ गावांमध्ये मूत्रीघर बांधण्याचे उपक्रम राबविण्याकरिता निविदा जाहिरात वृत्तपत्रात दिली. त्या वृत्तपत्राचे जनसामान्यांत अस्तित्व नसून राज्य शासनाच्या शासकीय जाहिरात सूचित नाव नाही. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात या साप्ताहिक वृत्रपत्राची माहितीच उपलब्ध नसल्याचे पत्राद्वारे सांगितले आहे. त्यामुळे तिरोडा कृषी विभाग चांगल्याच कचाट्यात सापडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
तालुका कृषी विभागाच्या मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाने तिरोडा तालुक्यातून प्रकाशित हिंदी साप्ताहिक तिरोडा एक्सप्रेसमध्ये २० मे २०१४ च्या अंकात शेवटच्या पृष्ठावर निविदा (सूचना क्र.४/२०१४-१५/दिनांक १८/५/२०१४) जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. ही जाहिरात कदाचित शहरातील लोकांनीही वाचली की नाही, यावर शंकाच व्यक्त करण्यात आली. निविदेच्या जाहिरातीनुसार तिरोडा / आय.डब्ल्यू.एम.पी.२ मधील २४ गावांत २.९० लांबी, १.९५ मीटर रुंदीचे बांधकाम करण्याकरिता निविदा मागविण्यात आली होती. एक मूत्रीघर बांधकामाची रक्कम २५ हजार असून अंदाजे निविदा रक्कम सहा लाख रूपये होती.
नोंदणीकृत कंत्राटदार वर्ग ३ ते ६ कडून निविदा मागवायच्या होत्या. शेवटची तारीख ३० मे २०१४ देण्यात आली होती. २ जून २०१४ ला निविदा उघडायच्या होत्या. अटी व शर्तीनुसार काम करणे बंधनकारक होते. परंतु तिरोडा कृषी विभागाच्या मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या स्वार्थाकरिता ही निविदा अधिक कंत्राटदारांना माहीत होवू नये, याकरिता सार्वजनिक ठिकाणी दिसू नये किंवा कोणी वाचू शकत नाही, अशा तिरोडा एक्सप्रेस या हिंदी साप्ताहिकमध्ये जाहीर कण्यात आली. मात्र कार्यालयातील फाईलला जोडून ठेवण्याकरिता आणि आपल्या जवळच्या कंत्राटदाराला काम देवून अधिक आर्थिक लाभ घेता येईल, याकरिता कृषी विभागाने असे केले आहे. मूत्रीघर बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या अनेक वृत्तपत्रांनी प्रकाशित केल्या होत्या. परंतु कारवाई करण्यात आली नाही. आजही अनेक गावातील मूत्रीघर नाकाम किंवा जीर्ण अवस्थेत असल्याची माहिती आहे.(वार्ताहर)