सल्लागार समितीने मानले रेल्वे अधिकाऱ्यांचे आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:52 AM2021-03-13T04:52:47+5:302021-03-13T04:52:47+5:30
गोंदिया : उत्तर दिशेकडे जाणारे दोन प्रवेशद्वार बंद असल्यामुळे प्रवासी आणि सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावत होत्या. याबाबत ...
गोंदिया : उत्तर दिशेकडे जाणारे दोन प्रवेशद्वार बंद असल्यामुळे प्रवासी आणि सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावत होत्या. याबाबत रेल्वे सल्लागार समितीमार्फत रेल्वेमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले होते. दरम्यान, रेल्वेस्थानकाच्या उत्तरेस रेलटोलीचे प्रवेशद्वार उघडण्यात आले. त्यामुळे रेल्वे सल्लागार समितीने सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.
शहरातील रेल्वे स्थानकाचे फक्त एक द्वार सुरू करण्यात आले होते आणि उत्तरेला लागलेले इतर दोन द्वार रेल्वे विभागाने गेल्या अनेक दिवसांपासून बंद ठेवले होते. ज्यामुळे नागरिक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांना गेटच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी १००-१५० रुपये खर्च करावा लागला. तसेच वेळेअभावी त्यांची गाडीही चुकायची. दोन्ही प्रवेशद्वार बंद असल्याने प्रवाशांना भूमिगत मार्गाने जावे लागत होते व जे खूपच त्रासदायक होते. दुसरीकडे स्थानकावर येताना किंवा बाहेर जाताना एखाद्याला ओव्हर ब्रीझमधून प्रवास करावा लागत होता. जे की वृद्ध आणि दिव्यांगासाठी शक्य नव्हते. याची दखल घेत रेल्वे सल्लागार समितीच्या वतीने रेल्वेमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी (दि.६) रेल्वेस्थानकाच्या उत्तरेकडील रेलटोलीचे प्रवेशद्वार उघडण्यात आले.
यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिक व प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. प्रवेशद्वार उघडण्यात आल्यामुळे रेल्वेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे आभार सल्लागार समितीचे सदस्य सुरज नशिने, दिव्या भगत-पारधी, इंजि. जसपालसिंह चावला, लक्ष्मण लधानी, राजेंद्र कावळे, हरिष अग्रवाल, हरिष गोपलानी, अखिल नायक, भेलुमन गोपलानी, स्मिता शरणागत, छैलबिहारी अग्रवाल यांनी मानले.