११ व्या यादीनंतरही २५ हजार शेतकरी वेटिंगवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:12 PM2018-10-24T22:12:02+5:302018-10-24T22:12:42+5:30
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत मागील वर्षी कर्जमाफीची घोषणा केली. यात जिल्ह्यातील ९० हजारावर शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आत्तापर्यंत ६३ हजार ६०३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत मागील वर्षी कर्जमाफीची घोषणा केली. यात जिल्ह्यातील ९० हजारावर शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आत्तापर्यंत ६३ हजार ६०३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर नुकतीच बँकांना कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ४ हजार ४४६ शेतकऱ्यांची अकरावी ग्रीन यादी प्राप्त झाली आहे.
यानंतरही कर्जमाफीस पात्र ठरलेले २५ हजार शेतकरी वेटिंंगवर आहेत. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या आॅनलाईन अर्जांची पडताळणी करुन त्याची येलो, ग्रीन आणि रेड अशा याद्या तयार करुन विभागणी केली जात आहेत. ग्रीन यादी ही अंतीम यादी असून यातील पात्र लाभार्थी शेतकºयांच्या कर्ज खात्यात कर्जाची रक्कम जमा केली जात आहे.
शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्ह्यातील ९० हजारावर शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आत्तापर्यंत ६३ हजार ६०३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून त्यांच्या बँक खात्यावर १५८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे.
जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँका आत्तापर्यंत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना एकूण १० ग्रीन याद्या प्राप्त झाल्या आहेत. तर मंगळवारी (दि.२३) ४४४६ शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या शेतकऱ्यांची ११ वी ग्रीन यादी प्राप्त झाली. तसेच या शेतकºयांचे कर्ज खाते शून्य करण्यासाठी ११ कोटी ८६ लाख रूपयांचा निधी सुध्दा जिल्हा बँकेला प्राप्त झाला आहे.
लवकरच सदर रक्कम पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करुन त्यांचे कर्ज खाते शून्य करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
प्रतीक्षा कायम
जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या एकूण शेतकºयांपैकी आत्तापर्यंत ६३ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. तर अजून जवळपास २५ हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अजून दोन तीन ग्रीन याद्या महाआॅनलाईनकडून येण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
१४ महिन्यानंतरही प्रक्रिया सुरूच
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा करुन जवळपास १४ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. शासन आणि महाआॅनलाईनकडून रोज नवीन नवीन निकष लावले जात असल्याचे कर्जमाफीच्या प्रक्रियेस विलंब होत आहे.