२३ वर्षांनंतर वाढले विद्यावेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 10:32 PM2017-12-04T22:32:10+5:302017-12-04T22:35:07+5:30

बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने कायदा करून श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत त्यांचा उत्थानासाठी पाऊले उचलण्यात आले.

After 23 years, Vidyartan grew | २३ वर्षांनंतर वाढले विद्यावेतन

२३ वर्षांनंतर वाढले विद्यावेतन

Next
ठळक मुद्दे४३ लाख बालकामगार : १५० रूपयावरुन झाले ४०० रुपये

नरेश रहिले।
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने कायदा करून श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत त्यांचा उत्थानासाठी पाऊले उचलण्यात आले. देशात आजघडीला ४३ लाख ५३ हजार २४७ बालकामगारांची नोंद शासन दरबारी आहे. त्यांना १९९४ पासून केवळ १५० रूपये प्रतिमहा या प्रमाणे विद्यावेतन दिले जायचे. मागील २३ वर्षापासून तितकेच विद्यावेतन दिले जात असल्याने बाल मजुरांच्या समस्येत पुन्हा वाढ झाली. शासनाने २३ वर्षानंतर त्यांच्या विद्यावेतनात २५० रूपयाने वाढ केली असून आता ४०० विद्यावेतन निश्चित केले आहे.
बालवय मनुष्यच्या जीवनात आनंदाचे क्षण देणारे असते. कसलीही चिंता कसलीही जबाबदारी राहात नाही. आपल्याच धुंदीत राहणाऱ्या काही बालकांवर धोक्याच्या ठिकाणी काम करून पोटाची खळगी भरण्याची वेळ येत असेल तर यापेक्षा कुठलेच दुर्देव नाही. कचरा गोळा करणारे, लोखंड जमा करून विक्री करणारे, हॉटेल व इतर व्यवसायात काम करणारे, भीक मागणारे बालके देशभरात आहेत. देशात बालकामगारांची संख्या सर्वाधीक असणारे राज्य उत्तरप्रदेश असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात ४ लाख ९६ हजार ९१६ बालकामगार असल्याची नोंद सरकारकडे आहे. आई-वडीलांच्या दुर्लक्षीतपणामुळे मांग गारुडी, नाथजोगी यांची मुले बालमजुरीकडे वळतात.
सरकारद्वारे बालकामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना दर महिन्याला १५० रूपये विद्यावेतन दिले जात होते. त्यामुळे बालमजुरी फोफावत होती. त्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात यावी ही सातत्याने मागणी होत होती. ती मागणी आता श्रम व रोजगार मंत्रालय दिल्ली यांनी ३१ आॅक्टोबर २०१७ पूर्ण केली आहे. १ एप्रिल २०१७ पासूनच्या विद्यावेतनाची वाढीव रक्कम बालकामगारांच्या आई-वडीलांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात बालमजुरी करणाऱ्यांचीही संख्या ४८६ आहे. या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने मागील ११ वर्ष केलेल्या प्रयत्नांमुळे १६२१ बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत झाली. तर २३२ बाल मजुरांसाठी ७ नवीन विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहेत. बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात १२ प्रशिक्षण केंद्र आहेत. यात ३८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गोंदिया तालुक्याच्या गौतमनगर, संजयनगर, कुडवा, गोंडीटोला व अदासी, सालेकसा तालुक्यात बाबाटोली, मुरकुडोहदंडारी व तिरोडा तालुक्याच्या काचेवानी, नवरगाव, मुंडीकोटा व घोघरा येथे प्रशिक्षण केंद्र सुरू आहेत.
२२०० बालकामगारांना पकडले
बाल कामगार कार्यालयद्वारे सन २००६ पासून आतापर्यंत २२०० बाल कामगारांना पकडण्यात आले. यात १६२१ बाल कामगारांना प्रकल्प समितीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यात आले. त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी नियमीत शाळेत पाठविले जात आहे. यातील बहुतांश बालके आपल्या पायावर उभी झाली आहेत. तर काही मुले उच्च शिक्षण घेत आहेत.
सर्वेक्षण पुढील महिन्यात
बालकामगार शोध मोहीम जिल्हाधिकारी कार्यालय व कामगार आयुक्त कार्यालयाकडून जानेवारी महिन्यात राबविण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यात आणखी किती बालकामगार आहेत त्यांचा शोध घेतला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्यानंतर शोध मोहीमेची निश्चीत तारीख ठरविण्यात येईल.

Web Title: After 23 years, Vidyartan grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.