३९ दिवसानंतर गोंदिया ग्रीन टू ऑरेंज झोनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:00 AM2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:00:32+5:30
आमगाव येथील एक महिला मुंबई येथे परिचारिका म्हणून काम करते. ती टॅक्सीने १६ मे रोजी गोंदिया येथे आली. येथे आल्यानंतर ती थेट येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली. यानंतर तिचे स्वॅब नमुने घेवून १६ मे रोजी नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. तिचा अहवाल सुध्दा मंगळवारी प्राप्त झाला असून ती सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह आढळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील ३९ दिवसांपासून ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा ग्रीन टू आँरेज झोनमध्ये परार्वतीत झाला आहे. यामुळे पुन्हा जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकमतने मंगळवारच्या अंकात स्थलांतरितांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्याचा अंदाज व्यक्त केला. त्यावर अखेर दोन रुग्ण आढळल्यानंतर शिका मोर्तब झाले आहे. तर प्रशासनाची डोळेझाक सुध्दा याला काही प्रमाणात कारणीभूत ठरली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी (दि.१९) कोरोना बाधीत आढळलेल्या दोन रुग्णांना मुंबईहून आलेल्या प्रवासाचा संदर्भ आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कऱ्हांडली येथील मजूर हा ट्रकने इतर मजुरांसोबत मुंबईहून अर्जुनी मोरगाव येथे १५ मे रोजी आला होता. त्याच्यासोबत आलेल्या सर्व मजुरांना क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते. विशेष याच मजुरांसह आलेला गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील दोन मजूर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने या दोंघासह अर्जुनी मोरगाव येथे परतलेल्या एकूण ६२ मजुरांना गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुलातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. यापैकी एका मजुराला ताप आल्याने त्याचे स्वॅब नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी १६ मे रोजी पाठविण्यात आले होता. त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला तो कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील काही परिसर कंटेमेन झोनमध्ये परार्वतीत करण्यात आला आहे.
तर आमगाव येथील एक महिला मुंबई येथे परिचारिका म्हणून काम करते. ती टॅक्सीने १६ मे रोजी गोंदिया येथे आली. येथे आल्यानंतर ती थेट येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली. यानंतर तिचे स्वॅब नमुने घेवून १६ मे रोजी नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. तिचा अहवाल सुध्दा मंगळवारी प्राप्त झाला असून ती सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह आढळली.
त्यामुळे मागील ३९ दिवसांपासून ग्रीन झोन असलेल्या गोंदिया जिल्ह्यात एकाच दिवशी दोन रुग्ण आढळल्याने जिल्हा आॅरेंज झोनमध्ये परार्वतीत झाला आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने आठवडाभरापासून जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत झाले होते.
मात्र दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने पुन्हा याचा सुरळीत असलेल्या सर्वच व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
स्थलांतरित मजुरांकडे दुर्लक्ष करणे भोवले
जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या होता. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त करुन ग्रीन झोनमध्ये ठेवण्यात यश आले होते. मात्र मागील आठवड्यापासून जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली होती.शिवाय बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्या मजुरांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्याचा धोका वाढला होता. लोकमतने सुध्दा या मुद्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. दरम्यान थोडासा दुर्लक्षितपणाने ३९ दिवसांपासून घेतलेल्या मेहनतीवर अखेर पाणी फेरले.
ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव
गोंदिया जिल्ह्यात गोंदिया येथे पहिला कोरोना बाधीत रुग्ण २६ मार्च रोजी आढळला होता. मात्र यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नव्हता. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. मात्र मंगळवारी गोंदिया जिल्ह्यात दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळले. यापैकी एक रुग्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कºहांडली येथील आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागासमोर आव्हान निर्माण झाले आहे.
नागरिकांनो आता तरी घ्या काळजी
जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश झाल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांनी सुध्दा सुरूवातीला जशी काळजी घेतली होती. तशी काळजी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर घेत नव्हते. मात्र आता जिल्ह्यात दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने जिल्ह्यावासीयांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता बाळगण्याची गरज आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे अथवा घराबाहेर पडू नये तसेच मास्क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर करावा.
जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
मागील ३९ दिवसांपासून गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने जिल्ह्यातील सर्व व्यावसायीक प्रतिष्ठाने, सलून सुरू करण्यात आले होते. तसेच बांधकामांना सुध्दा परवानगी देण्यात आली होती. मात्र मंगळवारी जिल्ह्यात दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन लॉकडाऊनमधील दिलेल्या सूट संदर्भात काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत यावर जिल्हाधिकारी कार्यालयात मंथन सुरु होते.