५८ वर्षानंतरही ‘स्वातंत्र्य संग्राम सेनानी’चा दर्जा नाही
By admin | Published: August 15, 2016 12:21 AM2016-08-15T00:21:02+5:302016-08-15T00:21:02+5:30
इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ‘करो या मरो’ या आंदालेनात भाग घेणाऱ्यास स्वातंत्र्य सेनानींचा दर्जा जिवंतपणी ....
अधिकारासाठी नातवाची धडपड : उच्च न्यायालयात मागीतली दाद
नरेश रहिले गोंदिया
इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ‘करो या मरो’ या आंदालेनात भाग घेणाऱ्यास स्वातंत्र्य सेनानींचा दर्जा जिवंतपणी तर सोडा मृत्यूच्या ५८ वर्षानंतरही मिळाला नाही. स्वातंत्र्यता संग्राम सेनानी निहाली कल्लू यादव (गवली) यांचे हे प्रकरण असून आपल्या आजोबांच्या या अधिकारासाठी त्यांचा नातू धडपडत आहे. स्वातंत्र्यता संग्राम सेनानीच्या प्रमाणपत्रासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
शहराच्या दुर्गा चौक कृष्णपुरा वार्डातील स्वातंत्र्य संग्राम सेनानी निहाली यादव यांच्या कामाच्या सन्मानासाठी त्यांचे नातू अविलाश ओमप्रकाश यादव यांनी मागील पाच वर्षापूर्वी अर्ज केला होता. परंतु प्रशासनाच्या उदासिनतेमुळे त्यांच्या आजोबांना प्रमाणपत्र मिळाले नाही. परिणामी त्यांना न्यायालयात जावे लागले. स्वातंत्र्यता संग्राम सेनानी निहाली यादव यांच्या मृत्यूनंतर 33 वर्षाने २४ एप्रिल १९९० ला त्यांचे नातू अविलाश यांना मुंबई वरून महाराष्ट्र शासनाचे एक पत्र मिळाले. या पत्राच्या माध्यमातून निहाली यादव यांना स्वातंत्र्यता संग्राम सेनानीचे प्रमाणपत्र द्यायचे होते. निहाली यादव यांना शासनातर्फे झालेल्या तुरूंगवासाचे प्रमाणपत्र मागीतले होते. ते कागदपत्र तयार करण्यासाठी बराच वेळ लागला.
त्यानंतर अविलाशने तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या माध्यमातून मुंबई येथील सामान्य प्रशासन विभागाला अर्ज केला होता. या अर्जासोबत यादव यांनी जबलपूर कारागृह, अतिरिक्त महानिदेशक व भोपाल च्या तुरूंग महानिरीक्षक, जबलपूर चे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र, जबलपूर येथील वैद्यकीय अहवाल व हेयरशिप रिपोर्ट अर्जासोबत जोडले होते.५ जानेवारी २०१५ ला मुंबई सामान्य प्रशासन विभागाचे जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र मिळाले. पत्रात निहाली यादव स्वातंत्र्यता संग्राम सेनानी आहेत व मुंबई प्रशासन विभागाद्वारे त्यांना स्वातंत्र्य संग्राम सेनानी घोषित करण्याचा उल्लेख करण्यात आला होता.
पत्रात स्पष्ट उल्लेख केला होता की,स्वातंत्र्यता संग्राम सेनानी सन्मान सेवानिवृत्ती वेतन योजना १९५६ अंतर्गत फक्त पत्नीला पेंशन मिळू शकते.परंतु १९८०, १९९०, २००८ व २००९ च्या शासन निर्णयानुसार अविवाहित मुलगा-मुलगी, नाती-नातू, भावाचा मुलगा किंवा कुटुंबातील सदस्यांना पेंशन दिली जाऊ शकते. स्वातंत्र्य संग्राम सेनानीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पेंशन योजनेंतर्गत तलाठी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या तपासणीनंतर कुटुंबाला पेंशन लागू करण्यात येते. परंतु या संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
भोगला १४ महिन्यांचा कारावास
स्वातंत्र्यता संग्राम सेनानी निहाली यादव यांनी ८ आॅगस्ट १९४२ च्या ‘करो या मरो’ आंदोलनात भाग घेतला. यासाठी त्यांना जबलपूर कारागृहात १४ महिने ठेवण्यात आले. २४ मार्च १९५७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला.
पाहिजे तसे प्रमाणपत्र मिळाले नाही
निहाली कल्लू यादव यांच्या कुटंबियांना जसे प्रमाणपत्र पाहिजे तसे प्रमाणपत्र मिळाले नाही. मुंबई मंत्रालय कक्ष अधिकारी म्हणाले, आधी पेंशन करीता अर्ज पाठवावे त्यानंतर पेंशन लागू झाल्यावर स्वातंत्र्य संग्राम सेनानीचे प्रमाणपत्र लागू करण्यात आले. परंतु निहाली यादव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पेंशनसाठी अर्ज करणारा कुणीच नसल्याने स्वातंत्र्य संग्राम सेनानी प्रमाणपत्र मिळणार कसे? जबलपूर तुरूंगाच्या प्रमाणपत्रावर शासन प्रमाणपत्र देऊ शकते. मात्र हे प्रमाणपत्र शासनाच्या हलगर्जीपणामुळे अडकलेले आहे.