६६ दिवसानंतरही हाल बेहाल
By Admin | Published: January 17, 2017 12:55 AM2017-01-17T00:55:10+5:302017-01-17T00:55:10+5:30
नोटबंदीनंतर ५० दिवसांत बँक ग्राहकांच्या समस्या संपुष्टात येतील असे आश्वासन पंतप्रधानांनी देशवासीयांना दिले होते.
परिस्थिती जैसे थे : बँक आॅफ महाराष्ट्रचे ग्राहक त्रस्त
सालेकसा : नोटबंदीनंतर ५० दिवसांत बँक ग्राहकांच्या समस्या संपुष्टात येतील असे आश्वासन पंतप्रधानांनी देशवासीयांना दिले होते. परंतु सालेकसा येथील बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये ग्राहकांची समस्या तीळमात्रही दूर झालेली नाही. आजही लोक सकाळी ८ वाजतापासून रांगेत उभे राहून रक्कम काढण्याची वाट बघतात. ६६ दिवस लोटूनही अनेक ग्राहकांना विनापैशानेच परत जावे लागत आहे.
३० ते ४० टक्के ग्राहकांना अन्य व मोजक्या प्रमाणात रक्कम दिल्यानंतर रक्कम संपल्याचे फलक कॅश काऊंटवर लावल्या जाते. त्यामुळे ६० ते ७० टक्के ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जाण्याची वेळ येत आहे. रांगेत उभे राहूनही कोणताच लाभ मिळत नाही. आदिवासी तालुका असल्याने सर्वसामान्य गरीब लोक वास्तव्यास आहेत. त्यांना वेळेवर पैसे मिळाले नाही तर त्यांचे बेहाल होते. परंतु बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये अशा लोकांचा सुध्दा विचार केला जात नाही. अशात त्यांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
बँक ग्राहकांसह आंदोलन छेडणार
सोमवार दि.१६ रोजी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे आणि जिल्हा काँग्रेस महासचिव सहषराम कोरोटे हे बँक आॅफ महाराष्ट्र सालेकसा येथे वास्तविकता जाणून घेण्यासाठी पोहोचले असता बँकेच्या बाहेर ग्राहकांची एकच गर्दी दिसून आली. अनेक ग्राहक सकाळपासून रांगेत उभे असल्याचे सांगत होते. रांगेत उभे राहून ही रक्कम मिळेल की नाही याबद्दल शाश्वती वाटत नव्हती. रांगेत उभे राहणाऱ्यामध्ये महिला व वृध्द, म्हातारेसुध्दा होते. बँकांत पुरेशा रकमेची व्यवस्था करुन दररोज सर्व ग्राहकांना हवी तेवढी रक्कम मिळण्याची सोय करावी, अन्यथा बँकेच्या ग्राहकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी दिला आहे.