७० वर्षांनंतर म्हैसुलीवासीयांना झाले एसटीचे दर्शन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:30 AM2021-09-19T04:30:12+5:302021-09-19T04:30:12+5:30
देवरी : दुर्गम गावात एसटी बस येण्याचा आनंदोत्सव या प्रगत काळात साजरा होत असेल तर कुणालाही नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय ...
देवरी : दुर्गम गावात एसटी बस येण्याचा आनंदोत्सव या प्रगत काळात साजरा होत असेल तर कुणालाही नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष लोटून ही एसटीच्या सुविधापासून गावातील लोक वंचित असतील याची कल्पनाही करु शकत नाही. परंतु देवरी पासून अवघ्या १५ किमी अंतरावरील जंगल व डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या म्हैसुली बोडे या दुर्गम आदिवासी गावात एसटी पोहचताच गावकऱ्यांचा गगनात मावेनासा झाला होता.
सुमारे ७०० च्या जवळपास लोकवस्ती असलेल्या गा म्हैसुली गावात एसटी बससेवा सुरु करण्यासाठी येथील युवा उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ता ईश्वर कोल्हारे यांनी वेळोवेळी शासन व प्रशासनाला निवेदन सादर करुन गावातील या समस्येकडे लक्ष वेधले. नागपूर-रायपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रं.६ वरील मरामजोब या गावापासून अवघ्या १५ किमी अंतरावर वसलेले मंगेझरी व म्हैसुली हे शंभर टक्के आदिवासी गाव आहे. या गावात जाण्यासाठी चांगला डांबरी रस्ता, दुतर्फ वृक्षांची रांगच रांग सभोवताली डोंगरदऱ्या त्यापैकी डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. म्हैसुली गावातून लहानाचे मोठे झालेले ईश्वर कोल्हारे यांनी आपल्या गावाचे ऋण फेडण्यासाठी शासन स्तरावर एसटी सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. भंडारा व साकोली एसटी विभाग आणि मुंबई मंत्रालय यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. विद्यार्थ्यांची शिक्षणाकरिता व इतर लोकांची दळणवळण करिता होणारी गैरसोय टाळण्यासाठी बससेवा सुरु करण्याची विनंती केली. या विभागाने संबंधितांना याबाबत आदेश दिले. यात काही तांत्रिक बाबींचे सर्वेक्षण एसटीची बससेवा करण्यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळाने पाऊल उचलले. त्यामुळे येथील लोकांमध्ये आनंद आहे. मात्र गावात एसटी बस आल्यावरच येथील लोकांच्या आनंदात आणखी भर पडेल हे नक्कीच.
.............
रस्त्याचे केले सर्वेक्षण
देवरी तालुक्यातील म्हैसुली येथे बस सुरु करण्यासाठी आगाराने शनिवारी प्रत्यक्ष या मार्गावर बस चालवून सर्वेक्षण केले. आगाराचे अधिकारी बस घेऊन म्हैसुली येथे दाखल होते. सर्वेक्षणाच्या निमित्ताने का होईना एसटी गावात दाखल झाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.