तब्बल 70 वर्षांनंतर उड्डाणपूल वाहतुकीसाठी झाला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 05:00 AM2022-05-06T05:00:00+5:302022-05-06T05:00:01+5:30

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई येथील मत्ते असोसिएट या कंपनीला काम दिले आहे. रेल्वे विभाग आणि शासनाने दिलेल्या डेडलाईननुसार हा पूल सहा महिन्यांच्या कालावधीत पाडायचा होता. मात्र, यापैकी दोन महिन्यांचा कालावधी निघून गेल्याने आता चार महिन्यांतच पूल पाडण्याचे काम पूर्ण करावे लागणार आहे. हा पूल पूर्णपणे पाडून झाल्यानंतर या ठिकाणी १२५ कोटी रुपये खर्चून नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू केले जाणार आहे.

After 70 years, the flyover was closed to traffic | तब्बल 70 वर्षांनंतर उड्डाणपूल वाहतुकीसाठी झाला बंद

तब्बल 70 वर्षांनंतर उड्डाणपूल वाहतुकीसाठी झाला बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावर १९५२ साली उड्डाणपूल तयार करण्यात आला होता. मात्र, हा उड्डाणपूल जीर्ण झाला असून त्यावरून वाहतूक सुरू ठेवणे धोक्याचे ठरू शकते यासंबंधीचे पत्र रेल्वेने जिल्हा प्रशासनाने दिला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने गुरुवारपासून (दि.५) हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी दोन्ही बाजूने बंद केला. हा जुना उड्डाणपूल तोडण्याच्या कामाला देखील सुरुवात केली. तब्बल ७० वर्षांच्या कालावधीनंतर हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला.
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई येथील मत्ते असोसिएट या कंपनीला काम दिले आहे. रेल्वे विभाग आणि शासनाने दिलेल्या डेडलाईननुसार हा पूल सहा महिन्यांच्या कालावधीत पाडायचा होता. मात्र, यापैकी दोन महिन्यांचा कालावधी निघून गेल्याने आता चार महिन्यांतच पूल पाडण्याचे काम पूर्ण करावे लागणार आहे. हा पूल पूर्णपणे पाडून झाल्यानंतर या ठिकाणी १२५ कोटी रुपये खर्चून नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यासाठी शासनाकडून निधी देखील मंजूर झाला आहे. सुरुवातीला विश्रामगृहाच्या बाजूने पूल तोडण्यास सुरुवात केली जाणार आहे. उड्डाणपुलाखालून रेल्वे ट्रॅक असल्याने त्यासाठी मेगा ब्लॉक घ्यावा लागणार असल्याने रेल्वेच्या तांत्रिक विभागाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूला टीना ठोकून व जेसीबीने रस्ता खोदून पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला. परिणामी, शहरवासीयांची तारांबळ उडाली होती. 

२० कुटुंबांचा रोजगार हिरावला 
- उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या जागेवर शहरातील २० नागरिकांनी छोटी छाेटी दुकाने सुरू केली होती. मागील ५० ते ६० वर्षांपासून यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, आता पूल पाडण्यात येणार असल्याने त्यांनासुद्धा तिथून हटविण्यात आले. त्यामुळे त्यांचा रोजगार देखील हिरावला आहे. त्यामुळे या व्यावसायीकांना दुसऱ्या जागेचा शोध घ्यावा लागत आहे. 

बांधण्यासाठी लागले ३५ कोटी, तोडायला लागणार ६ कोटी रुपये 
गोंदिया-बालाघाट मार्गावर १९५२ ला उड्डाणपूल तयार करण्यात आला होता. तेव्हा या पुलाच्या बांधकामासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. आता तब्बल ७० वर्षांनंतर हा पूल तोडण्यात येणार आहे. त्यासाठी ६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.  पूल तोडण्याचे कंत्राट मुंबई येथील मत्ते असोसिएट या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीचे कर्मचारी गुरुवारी गोंदिया दाखल झाले. 

 ७२ कुटुंब येणार उघड्यावर 
- जुन्या उड्डाणपुलाखाली मागील ५० ते ६० वर्षांपासून ७२ कुटुंब पक्के घरी बांधूृन वास्तव्यास आहेत. मात्र, अतिक्रमण करून राहत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या ७२ कुटुंबांना नोटीस देऊन जागा खाली करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे या कुटुंबांना निवाऱ्याविना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. 
पहिल्याच दिवशी वाहतुकीची कोंडी 
- जुना उड्डाणपूल गुरुवारपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूकडील नागरिकांना शहरात येण्यासाठी अडचण निर्माण झाली. याला पर्याय म्हणून शहरातील अंडरग्राऊंड परिसरातील रस्त्याने सर्व वाहने वळविण्यात आली. मात्र, या परिसरातसुद्धा रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागला. 
जुना जीर्ण, तर नवीन सदोष 
- जुना उड्डाणपूल जीर्ण झाला आहे याला पर्याय म्हणून याच मार्गावर ८८ कोटी रुपये खर्चून नवीन उड्डाणपूल तयार करण्यात आला. मात्र, या पुलाच्या दोन्ही बाजूला पादचारी पुलासाठी जागाच सोडण्यात आली नाही, तर या पुलाचा उतार देखील धोकादायक असल्याने यावर अपघाताची शक्यता अधिक आहे. पुलावरून पायी जाण्यासाठी जागा नसल्याने पादचारी नागरिक या नवीन उड्डाणपुलावरून जाणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 

 

 

Web Title: After 70 years, the flyover was closed to traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.