अखेर बिडी कारखान्याची जीर्ण इमारत जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:57 AM2018-02-24T00:57:08+5:302018-02-24T00:57:08+5:30
शहराच्या मुख्य बाजार पेठेतील १०३ वर्षे जुन्या हाजी लतीफ गणी बिडी कारखान्याची जीर्ण इमारतीचा दर्शनी भाग नगर परिषदेने शुक्रवारी (दि.२३) बुलडोजर लावून जमीनदोस्त केला.
ऑनलाईन लोकमत
तिरोडा : शहराच्या मुख्य बाजार पेठेतील १०३ वर्षे जुन्या हाजी लतीफ गणी बिडी कारखान्याची जीर्ण इमारतीचा दर्शनी भाग नगर परिषदेने शुक्रवारी (दि.२३) बुलडोजर लावून जमीनदोस्त केला.
ही इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने शेजाऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. यासाठी येथील नागरिकांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. विशेष म्हणजे या इमारतीत बिडी कारखाना अनेक वर्षापासून सुरु होता. येथे सुमारे १७० जण कार्यरत असून कंपनी व्यवस्थापक मोहम्मद अली, फॅक्ट्री व्यवस्थापक समीमभाई खान, रोखपाल असे चार जण रहायचे. या कारखान्यावर अनेक बिडी कामगार, ठेकेदार व कर्मचाऱ्यांची उपजिविका चालते. या इमारतीत तेंदूपत्ता, बिड्या व तंबाखूचे गोदाम आहे. तसेच पक्या बिड्या तयार करण्याकरिता तंदूर लावल्या जातो. त्या धुरामुळे शेजाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. या विरोधात शेजाऱ्यांनी तक्रारी केल्या. तसेच या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्याचीच दखल घेत नगर पालिकेने सक्षम संस्थेकडून जीर्ण इमारतीचे परीक्षण करवून घेतले. प्राप्त अहवालानुसार सदर इमारत जीर्ण व धोकादायक ठरविण्यात आली. इमारत पडून काही अपघात घडल्यास बिडी कारखाण्यातील तसेच समोर व मागील रहदारीच्या मार्गावरील लोकांना धोका होण्याची शक्यता होती.
नगर परिषदेने सदर इमारत पाडण्याकरिता कंपनीला नोटीस दिली. कंपनीने या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यात त्यांना अपयश आले. नगर पालिकेने २१ फेब्रुवारीला २४ तासाची मुदत देऊन इमारत रिकामी करुन पाडण्याची नोटीस दिली. शुक्रवारी (दि.२३) सकाळी ११ वाजतापासून इमारत पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
वृत्त लिहिपर्यंत इमारतीचा दर्शनी भाग बुलडोजरने पाडण्यात आला होता. या वेळी मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
या कारवाहीमुळे पिडित शेजाºयांनी समाधान व्यक्त केले. शहरातील इतर अतिशय जुन्या इमारतीचे परीक्षण करुन त्यांवरही योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.