तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर बरसला धो धो; पाच तालुक्यांत अतिवृष्टी, नदी नाल्यांना पूर
By अंकुश गुंडावार | Published: July 16, 2023 06:33 PM2023-07-16T18:33:44+5:302023-07-16T18:33:54+5:30
जुलै महिना अर्धा संपत असताना आणि केलेल्या पेरण्या करपण्याच्या मार्गावर असल्याने जिल्ह्यातील बळीराजाचे लक्ष वरुण राजाच्या प्रतीक्षेत महिनाभरापासून आकाशाकडे लागले होते.
गोंदिया : जुलै महिना अर्धा संपत असताना आणि केलेल्या पेरण्या करपण्याच्या मार्गावर असल्याने जिल्ह्यातील बळीराजाचे लक्ष वरुण राजाच्या प्रतीक्षेत महिनाभरापासून आकाशाकडे लागले होते. अखेर महिनाभराच्या कालावधीनंतर पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने बळीराजासह जिल्ह्यावासीय सुध्दा सुखावले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर रविवारी (दि.१६) सकाळपर्यंत कायम राहिल्याने जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६३.०३ मिमी पाऊस झाला असून आठपैकी पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पुजारीटोला धरणाचे ४ व कालीसरार धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे.
जिल्ह्यात तिरोडा तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यात दमदार पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात सर्वाधिक ८८.५ मिमी पावसाची नोंद सडक अर्जुनी तालुक्यात झाली आहे. दमदार पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी-बोळूंदा नाल्यावर तयार केलेला रपटा वाहून गेल्याने या दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. तर गोंदिया-आमगाव मार्गावरील पांगोली नदीवरील पुलाचे बांधकाम सुरु असून यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र पांगोली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुलावरुन पाणी वाहत असल्याने हा मार्ग सुध्दा रविवारी रात्रीपर्यंत बंद होता.
त्यामुळे गोंदियावरुन आमगावला जाण्यासाठी नागरिकांना दुसऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. शनिवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर रविवारी दिवसभर कायम होता तर धरण क्षेत्रात सुध्दा पावसाचा जोर कायम असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ४ व कालीसरार धरणाचे दोन दरवाजे ०.३० मिटरने उघडण्यात आले होते. या दोन्ही धरणातून ६०२१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. तब्बल महिनाभराचा कालावधीनंतर दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून रोवणीच्या कामाला वेग येणार आहे. तर दमदार पावसामुळे नदी-नाले सुध्दा दुतर्फा भरुन वाहत होते. तर उकाड्याने त्रस्त असलेल्या जिल्हावासीयांना सुध्दा दिलासा मिळाला.
सडक अर्जुनी तालुक्याला पावसाने झोडपले
जिल्हयात गेल्या २४ तासात सरासरी एकूण ६३.०३ मिमी पावसाची नोंद झाली. तर सर्वाधिक ८८.०५ मिमी पावसाची नोंद सडक अर्जुनी तालुक्यात झाली आहे. तर सर्वात कमी १४.३ मिमी पाऊस तिरोडा तालुक्यात झाला आहे. तर सडक अर्जुनी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी असे चित्र निर्माण झाले होते. तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पाच तालुक्यांवर वरुणराजा प्रसन्न
गेल्या चौवीस तासात सडक अर्जुनी, गोंदिया, सालेकसा, देवरी, आमगाव या पाचही तालुक्यात सरासरी ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद ही देवरी तालुक्यात झाला असून सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
चोवीस तासात झालेल्या पावसाने गाठली जुलैची सरासरी
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी १२२० मिमी पाऊस पडतो. त्यापैकी १६ जुलैपर्यंत सरासरी ५२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चौवीस तासात झालेल्या दमदार पावसामुळे जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसाची कमतरता भरुन निघाली आहे.
नदीकाठालगतच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून पुजारीटोला धरणाचे चार व कालीसरार धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. तर धरणात क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदी काठालगतच्या गावकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रोवणीच्या कामाला येणार गती
जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे रोवणीची कामे खोळंबली होती. केवळ ५.४ टक्केच पेरण्या झाल्या होत्या. मात्र गेल्या २४ तासात झालेल्या दमदार पावसामुळे आता सोमवारपासून रोवणीच्या कामाला वेग येणार आहे.
मागील २४ तासात प्रत्येक तालुक्यात पडलेला पाऊस
- गोंदिया ६५.१
- सालेकसा ७५.७
- देवरी ६८.८
- अर्जुनी मोरगाव ६०.२
- सडक अर्जुनी ८८.५
- गोरेगाव ६२.४
- आमगाव ७६.४
- तिरोडा १४.३
- एकूण ६३.०३