प्रशासकाच्या आश्वासनानंतर न.प. कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:46+5:302021-06-11T04:20:46+5:30
आमगाव : येथील नगर परिषद कर्मचाऱ्यांना कार्यालयातील प्रभारी अधिकारी त्रास देत असल्याची अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर ...
आमगाव : येथील नगर परिषद कर्मचाऱ्यांना कार्यालयातील प्रभारी अधिकारी त्रास देत असल्याची अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. याकरिता शुक्रवारपासून (दि. १०) कामबंद आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत नगर परिषदेचे प्रशासक डी.एस. भोयर यांनी तातडीची बैठक घेऊन संबंधित यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले.
येथील नगर परिषदेतील प्रभारी अधिकारी नागेश लोणारे हे इतर कर्मचाऱ्यांना उद्धटपणे बोलणे, शिवीगाळ करणे व अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला होता. यामुळे कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास होत आहे. याकडे लक्ष देऊन प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर यावर तोडगा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगर परिषद कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी व नगर परिषदेचे प्रशासक यांना दिलेल्या निवेदनातून दिला होता. मात्र, यावर प्रशासनाने तोडगा न काढल्याने कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत न.प. प्रशासक व तहसीलदार डी.एस. भोयर यांनी दखल घेऊन तातडीची बैठक घेतली. संबंधित प्रकरणाची चौकशी करून यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले. यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, कार्यवाही न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.