ब्रेकनंतर अतिक्रमण हटाव मोहीम जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 06:00 AM2019-11-23T06:00:00+5:302019-11-23T06:00:26+5:30

गोंदिया शहरातील रस्ते रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहे. त्यामुळे सण आणि उत्सवाच्या कालावधीत वाहतुकीच्या कोंडीचे चित्र पाहयला मिळते. तर इतर वेळेस शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा फटका शहरवासीयांना सहन करावा लागतो. मात्र यावर कायम स्वरुपी तोडगा काढण्यात नगर परिषदेला अद्यापही यश आलेले नाही.

After the break, the encroachment expedite the campaign | ब्रेकनंतर अतिक्रमण हटाव मोहीम जोरात

ब्रेकनंतर अतिक्रमण हटाव मोहीम जोरात

Next
ठळक मुद्देजब जागो तब सवेरा धोरण : इंदिरा क्रीडा संकुल परिसरातील अतिक्रमण हटविले

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया नगर परिषद आणि वाहतूक नियंत्रण विभागाला जेव्हा जाग येते तेव्हाच अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली जात असल्याचे चित्र आहे. या दोन्ही विभागाने आजवर शहरात अनेकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मात्र या मोहिमेत सातत्याने ठेवण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम शहरात एक चर्चेचा विषय ठरली आहे.जवळपास सात ते आठ महिन्यानंतर वाहतूक नियंत्रण विभागाने शुक्रवारपासून (दि.२२) अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात केली. त्यामुळे आॅफ्टर दी ब्रेकनंतर सुरू केलेली ही मोहीम किती दिवस चालणार असा सवाल शहरवासीयांकडून केला जात आहे.
गोंदिया शहरातील रस्ते रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहे. त्यामुळे सण आणि उत्सवाच्या कालावधीत वाहतुकीच्या कोंडीचे चित्र पाहयला मिळते. तर इतर वेळेस शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा फटका शहरवासीयांना सहन करावा लागतो. मात्र यावर कायम स्वरुपी तोडगा काढण्यात नगर परिषदेला अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे शहरवासीयांचा त्रास कायम आहे. नगर परिषदेने शहरातील अतिक्रमण काढण्याच्या मोहीमेला शुक्रवारपासून पुन्हा सुरूवात केली.
इंदिरा गांधी क्रीडा संकुलासमोरील दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले. वाहतूक नियंत्रण विभागाने पोलीस निरीक्षक तायडे यांच्या नेतृत्त्वात या अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात करण्यात आली. इंदिरा गांधी क्रीडा संकुल परिसरात नगर परिषदेने फुटपाथ विक्रेत्यांसाठी गाडे तयार करुन ते भाडेतत्त्वावर दिले आहे. यासाठी प्रत्येक गाडेधारकाला ५ फूट जागा देण्यात आली आहे. मात्र हे गाडेधारक १० ते १५ फूट जागेवर अतिक्रमण करतात. परिणामी रहदारासाठी फारच कमी रस्ता शिल्लक राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. हे अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्यात येत असल्याचे तायडे यांनी सांगितले.
गाडेधारकांना नगर परिषदेने उपलब्ध करुन दिलेल्या जागेतच व्यवसाय करण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी सुध्दा नगर परिषद आणि वाहतूक नियंत्रण विभागाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून या परिसरातील अतिक्रमण हटविले. मात्र सकाळी अतिक्रमण हटविल्यानंतर सायंकाळी पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे ही मोहीम केवळ नाममात्र ठरत आहे. दरम्यान शुक्रवारी वाहतूक नियंत्रण विभागाने सुरु केलेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेत २४ ते २५ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. अतिक्रमण हटाव मोहीमेसाठी नगर परिषदेचे ट्रॅक्टर सुध्दा वापरण्यात येत असल्याने ही मोहीम या दोन्ही विभागाच्या संयुक्तपणे राबविण्यात येत असल्याची चर्चा आहे.
मोहीमे दरम्यान जप्त केलेले साहित्य वाहतूक नियंत्रण विभागाच्या गोदामात जमा केले जात होते. लवकरच शहरात व्यापक स्वरुपात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून वाहतुकीसाठी रस्ते मोकळे करुन देण्यात येणार असल्याचे तायडे यांनी सांगितले.

रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण जैसे थे
वाहतूक नियंत्रण विभागाने सहा महिन्यांपूर्वी शहरातील विविध भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून अतिक्रमण हटविले होते. यात रेल्वे स्थानक परिसराचा सुध्दा समावेश होता. मात्र मोहीमेनंतर रेल्वे स्थानकाकडे जाण्याच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजुुला अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊन त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो.
ही मोहीम किती दिवस चालणार
नगर परिषद असो वा वाहतूक नियंत्रण विभाग या दोन्ही विभागाकडून शहरात अनेकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मात्र या मोहीमेत कधीच सातत्य राहिले नाही. परिणामी अतिक्रमणाची समस्या कायम आहे.त्यामुळे वाहतूक नियंत्रण विभागाने शुक्रवारपासून सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम किती दिवस चालणार असा सवाल शहरवासीय करीत आहे.

यंत्रणेवर नेमका दबाब कुणाचा?
नगर परिषद आणि वाहतूक नियंत्रण विभागातर्फे शहरातील गोरेलाल चौक व बाजारपेठ परिसरात अनेकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मात्र ती मध्येच बंद केली जाते. हा प्रकार आता नित्याचाच झाला आहे. या परिसरात काही बडे व्यापारी आणि नेत्यांची घरे असल्याने या मोहीमेला ब्रेक लागत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोन्ही विभागाच्या यंत्रणेवर मोहीम बंद करण्यासाठी नेमका दबाव कुणाचा येतो असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: After the break, the encroachment expedite the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.