ब्रिटिशकालीन वास्तू झाल्या बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 05:00 AM2020-08-27T05:00:00+5:302020-08-27T05:00:40+5:30
ब्रिटीश देश सोडून जाण्यास पाऊणशे वर्ष लोटत आहे. तरी देखील त्यांनी उभारलेल्या काही वास्तू आजही ठणठणीत आहेत. आमगाव ते सालेकसा तालुक्याची सीमा ठरविणाऱ्या बाघ नदीचा धानोली येथील रेल्वेचे पूल ब्रिटीश काळात बांधण्यात आला आहे. या पुलाने शंभरीही ओलांडली आहे. तरीही मुंबई-कोलकाता लोहमार्गावर असलेला हा पूल आजही ठणठणीत आहे. ब्रिटीशांच्या काळात बांधण्यात आलेल्या वास्तूंचा दर्जा उत्तमच आहे.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात ब्रिटीशांनी अनेक ठिकाणी चांगल्या वास्तू तयार केल्या होत्या. परंतु भारत देश सोडून ब्रिटीश गेले त्याला पाऊणेशे वर्ष लोटले आहेत. जिल्ह्यात त्यांनी तयार केलेल्या बोटावरच मोजण्या इतक्याच वास्तू शिल्लक आहेत. काही वास्तूंकडे दुर्लक्ष झाल्याने त्या वास्तू आजही भग्नावस्थेत आहेत.तर काही वास्तूंचे नविनीकरण करण्यात आले आहे.
ब्रिटीश काळात तयार करण्यात आलेल्या वास्तूचे साहित्य इतर वास्तू बांधकाम करताना वापरण्यात आले नाहीत.सार्वजनिक बांधकाम विभागान दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आता एकही ब्रिटीश कालीन पूल अस्तीत्वात नाही. काही महत्त्वाच्या वास्तूंचे नुतनीकरण करून त्या ठिकाणातून आजही व्यवहार व व्यापार केला जात आहे. भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत भारतात ज्या वास्तू तयार करण्यात येतात त्या ‘दो दिन की चांदणी, बाकी अंधेरी रात’ या म्हणी सारख्या आहेत. जेव्हा नवीन वास्तू तयार करण्यात येतात तेव्हा त्या निटनेटक्या आणि दिसायला सुंदर असतात. परंतु त्या टिकाऊ नसल्याचे हजारो उदारहणे समोर येतात. वास्तू ज्या दर्जाच्या तयार करायची आहे, त्या दर्जाच्या तयारच होत नाही. ब्रिटीश कालीन वास्तूमध्ये गोंदिया तालुुक्यातील बिरसी विमानतळाचा समावेश आहे. या विमानतळाचे २००५ मध्ये नुतनीकरण करण्यात आले आहे.
ब्रिटीश देश सोडून जाण्यास पाऊणशे वर्ष लोटत आहे. तरी देखील त्यांनी उभारलेल्या काही वास्तू आजही ठणठणीत आहेत. आमगाव ते सालेकसा तालुक्याची सीमा ठरविणाऱ्या बाघ नदीचा धानोली येथील रेल्वेचे पूल ब्रिटीश काळात बांधण्यात आला आहे. या पुलाने शंभरीही ओलांडली आहे. तरीही मुंबई-कोलकाता लोहमार्गावर असलेला हा पूल आजही ठणठणीत आहे. ब्रिटीशांच्या काळात बांधण्यात आलेल्या वास्तूंचा दर्जा उत्तमच आहे.
तिरोडाचे डाक कार्यालय
तिरोडा तालुक्यातील डाक घर व दुय्यम निबंधक कार्यालय ब्रिटीशकालीन आहे. ती वास्तू आजही जशीच्या तशी ठणठणीत आहे. तिरोडाच्या डाक कार्यालयातून व दुय्यम निबंधक कार्यालयातून आजही दररोज व्यवहार सुरू आहे. ब्रिटीशकालीन लावलेल्या कवेलू काढून त्यावर टिनपत्रे टाकून त्यातून कार्यालये चालविले जात आहेत.
विमानतळाचे झाले नुतनीकरण
गोंदिया आधीपासूनच जिल्ह्याचे केंद्रबिंदू होते. दुसºया महायुध्दाच्या काळात १९४२ मध्ये उभारण्यात आलेले बिरसी येथील विमानतळ आजही त्याच ठिकाणी आहे. या बिरसी विमानतळाचे नुतनीकरण २००५ मध्ये तत्कालीन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले. या ठिकाणी वैमानिकांना प्रशिक्षण दिले जात असल्याने या विमानतळाचे नुतणीकरण करण्यात आले.विशेष म्हणजे पायलट प्रशिक्षण केंद्र सुध्दा या ठिकाणी आहे.
हाजराफॉल रेस्टहाऊसच्या उरल्या फक्त भिंती
जिल्हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. सालेकसा तालुक्याच्या दरेकसा परिसरात असलेला धबधबा हा हाजराफॉल नावाने प्रसिध्द झाला. ब्रिटीशांच्या काळात या धबधबा येथे ब्रिटीश अधिकाऱ्यांचे विश्रामगृह होते. परंतु ते विश्रामगृह केव्हाचेच बंद झाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही दिवस सरकाने त्या वास्तूकडे लक्ष दिले. परंतु कालांतराने या निसर्ग सौंदर्याकडे दुर्लक्ष झाल्याने ते विश्रामगृह नष्ट झाले. फक्त त्या विश्रामगृहाच्या फक्त भिंतीच उभ्या आहेत.
बिरसीच्या वसाहतीत वास्तव्य
गोंदिया तालुक्याच्या बिरसी येथे बंगाली वसाहत आहे.त्या वसाहतीत शंभर ते सव्वाशे घरे आहेत. यातील काही घरे जीर्ण होऊन पडली आहेत. तर काही घरांचे अंशत: नुतनीकरण करून त्या वसाहतीत तीन पिढ्यांचे वास्तव्य आहे. जूने ते सोने ही म्हण या बिरसी येथील वसाहतीकडे पाहून आपोआपच ओठावर येते.
इंजिनशेड शाळा
गोंदियाच्या नगर परिषदेअंतर्गत सिव्हील लाईनच्या डब्लींग ग्राऊंड परिसरात असलेले इंजिनशेडमध्ये नगर परिषदेची आजही शाळा भरते. गोंदिया नगरपरिषदेची ही शाळा आजही इंजिनशेड नावाने प्रसिध्द आहे. त्या शाळेकडे न.प.चे सपशेल दुर्लक्ष आहे.
शंभरी ओलांडलेले पूल
सन १८८१ ला हावडा-मुंबई रेल्वे मार्ग तयारकरण्यात आला. १८८२ ला बाघनदीच्या धानोली येथे तयार करण्यात आलेला ब्रिटीशकालीन पूल आज शंभरी ओलांडून ठणठणीत सेवा देत आहे. या पूलाने चार पिढ्या पाहिल्या आहेत.
नवीन पुलांची निर्मिती
गोंदिया जिल्ह्यातून दोन लोहमार्ग गेले आहेत. एक मुंबई-हावडा तर दुसरा गोंदिया-चांदाफोर्ट ह्या दोन्ही रेल्वे रूळावर ब्रिटीशांच्या काळात लोहमार्ग तयार करण्यात आले. या लोहमार्गावरील तयार करण्यात आलेले पूल इंग्रजांनी तयार केले होते. परंतु ते पूल छोटे होते. तसेच कालांतराने त्या पुलांची अवस्था बिकट झाल्याने भारत सरकारने त्या ठिकाणी नविन पुलांची निर्मिती केली. गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश रेल्वेपूल भारत सरकारने तयार केलेले आहेत. ब्रिटीश काळातील रेल्वे पूल किंवा इतर वास्तू कमीच आहेत.