-तर एसपी कार्यालयासमोरच उपोषण
By Admin | Published: November 21, 2015 02:11 AM2015-11-21T02:11:50+5:302015-11-21T02:11:50+5:30
अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दारूला गावातून हद्दपार करण्याचा संकल्प करीत पांढराबोडी गावात दोन महिन्यांपूर्वी दारूबंदी महिला समिती स्थापन झाली.
दारूबंदी समितीचा इशारा : दारूविक्रीला पोलिसांचेच पाठबळ
गोंदिया: अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दारूला गावातून हद्दपार करण्याचा संकल्प करीत पांढराबोडी गावात दोन महिन्यांपूर्वी दारूबंदी महिला समिती स्थापन झाली. पण अवघ्या काही दिवसातच या समितीचा भ्रमनिरास झाला आहे. हातभट्टीची दारू काढणाऱ्यांना आणि विकणाऱ्यांना पोलीसच पाठीशी घालत असल्याचा अजब प्रकार महिलांना पहायला मिळत आहे. त्यामुळे १५ दिवसात हा प्रकार बंद करा, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच उपोषण सुरू करू, असा इशारा दारूबंदी महिला समितीने दिला आहे.
पांढराबोडी गावात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू गाळप करणारे आणि विकणारे लोक आहेत. यामुळे कित्येक जण दारूच्या आहारी जाऊन त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांची शरीर खंगून जाऊन त्यांनी इहलोकीची यात्रा संपविली. भावी पिढी तरी दारूच्या आहारी जाण्यापासून वाचावी म्हणून गावातील महिलांनीच पुढाकार घेतला आणि २० सप्टेंबर २०१५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड यांच्या उपस्थितीत गावात कार्यक्रम घेऊन दारूबंदी महिला समिती स्थापन करण्यात आली.
गावात कोणीही अवैधपणे दारूविक्री करू नये, केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. दारूविक्रेत्यांना आळा घालणाऱ्या महिलांना संरक्षण देण्यात येईल अशा अनेक गोष्टी पोलीस अधिकाऱ्यांनी गावकरी महिलांसमोर ठासून सांगितल्या. नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे महिला समितीला ९ दिवस चांगला अनुभव आला. पण नंतर मात्र पोलिसांचे सहकार्य, संरक्षण हळूहळू दूर झाले. त्यामुळे दारूविक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढले. आता समितीच्या महिला कुठे-कुठे दारूविक्री सुरू आहे हे पाहण्यासाठी गावात फेरफटका मारतात तेव्हा दारू विक्रेते आणि पिणारे लोक त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करतात, जीवे मारण्याची धमकीही देतात.
जिल्ह्याचे ‘कर्तव्यदक्ष’ पोलीस अधीक्षक तरी याकडे लक्ष देऊन कनिष्ठ कर्मचाऱ्यांना योग्य ते निर्देश देतील अशी आशा पांढराबोडीच्या महिलांना आहे. त्यासाठी त्यांनी एक निवेदन ठाणेदारांना व पोलीस अधीक्षकांना पाठविले आहे. १५ दिवसात बदल दिसला नाही तर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू करणार, असा इशारा दारूबंदी समितीच्या अध्यक्ष विमला दमाहे, उपाध्यक्ष खुरन मेश्राम, सचिव गीता मेश्राम यांच्यासह ४४ महिलांनी आपल्या सह्यांसह दिलेल्या निवेदनातून दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)