पंधरा दिवसांनंतर बरसल्या पावसाच्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:18 AM2021-07-24T04:18:41+5:302021-07-24T04:18:41+5:30
गोंदिया : जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे तलाव, बोड्या, नदीनाले सर्वच कोरेडे ...
गोंदिया : जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे तलाव, बोड्या, नदीनाले सर्वच कोरेडे पडले होते. तर पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवण्यादेखील खोळंबल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली होती. दरम्यान शुक्रवारी (दि.२३) सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर झालेल्या पावसामुळे सर्वत्र रस्त्यांवर पाणी साचले होते. तर शेतकऱ्यांवरील काळजीचे सावट काही प्रमाणात दूर झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.
हवामान विभागाने यंदा सुरुवातीलाच १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज यंदा पूर्णपणे फोल ठरला. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी टाकलेले पऱ्हेदेखील वाळण्याच्या मार्गावर होते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी कशी बशी रोवणी आटोपली, मात्र ज्या शेतकऱ्यांची शेतीवर थेंबी पावसावरच अवलंबून आहे ते शेतकरी अडचणीत आले होते. जिल्ह्यात यंदा १ लाख ८१ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात येणार आहे. मात्र जुलै महिना संपत आला तरी केवळ २५ टक्केच रोवण्या झाल्या होत्या. तर तलाव, बोड्या, नदीनाले सुध्दा कोरडे पडले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. तर पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. पावसाअभावी उकाड्यातदेखील प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे जिल्हावासीयसुध्दा त्रस्त झाले होते. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाची बॅटिंग सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरूच होती. त्यामुळे शेतातील बांध्यामध्येसुध्दा पाणी साचल्याचे तर नालेसुध्दा दुथडी भरून वाहत असल्याचे दिलासादायक चित्र होते. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून रोवणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे.
...............
दोन तालुक्यात अतिवृष्टी
जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर तिरोडा आणि गाेरेगाव तालुक्यात ६५ मि.मी. वर पावसाची नोंद झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभर जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम होता, त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र होते.
.............
जिल्ह्यात आतापर्यंत पडलेला तालुकानिहाय पाऊस
गोंदिया : ४६६.३ मि.मी., ३८.६ टक्के
आमगाव : ३६०.९ मि.मी., २५.३ टक्के
तिरोडा : ५०२.९ मि.मी., ४३.७ टक्के
गोरेगाव : ४१४.८ मि.मी., ४०.४ टक्के
सालेकसा : ३७५ मि.मी., ३२.४ टक्के
देवरी : ४२८.७ मि.मी. ३३.२ टक्के
अर्जुनी मोरगाव ५६४ मि.मी., ४२.९ टक्के
सडक अर्जुनी ४११.४ मि.मी., ३०.९ टक्के
................................
जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस
गोंदिया- ५९.४ मि.मी.
आमगाव- ४३.४ मि.मी.
तिरोडा : ६६.२ मि.मी.
गोरेगाव : ६८.३ मि.मी.
सालेकसा : ३३.६ मि.मी.
देवरी- ३८.८ मि.मी.
अर्जुनी मोरगाव- २५.३ मि.मी.
सडक अर्जुनी : ४०.८ मि.मी.
..............................................
एकूण सरासरी : ४७.१ मि.मी.
....................
पावसाची तूट कायम
जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी १२२०.३ मि.मी. पाऊस पडतो, तर १ जून ते २३ जुलै या कालावधीत ५००.६ मि.मी. पाऊस पडतो. मात्र यंदा याच कालावधीत ४४९.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसाची एकूण टक्केवारी ८९. ८ टक्के आहे.
..............