पतीच्या पाठोपाठ पत्नीचीही प्राणज्योत मालवली
By admin | Published: May 24, 2017 01:35 AM2017-05-24T01:35:13+5:302017-05-24T01:35:13+5:30
काळ कुणासाठी थांबत नाही, जो जन्माला येणार तो एक ना एक दिवस आप्तस्वकीय-नातलग सोडून देवाघरी जाणार.
चार लेकी झाल्या अनाथ : बालवयात माता-पित्याचे छत्र हरपले
अमरचंद ठवरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : काळ कुणासाठी थांबत नाही, जो जन्माला येणार तो एक ना एक दिवस आप्तस्वकीय-नातलग सोडून देवाघरी जाणार. म्हणजे मृत्यू अटळ आहे, हे त्रिकालबाधित सत्य आहे. परंतु अनपेक्षीतपणे एखाद्याचे मरण त्या कुटुंबावर वज्राघात ठरणारे असते. काही ध्यानीमनी नसताना एकाएकी अल्पश: आजाराने पतीचे निधन झाले. ते दु:ख सावरत असतानाच मोजक्या २५ दिवसांच्या कालावधीत पत्नीचीही जीवन यात्रा संपल्याची घटना निमगाव-बोंडगाव येथे सूर्यवंशी कुटुंबात शुक्रवारला (दि.१९) घडली.
२५ दिवसांच्या अंतराने पती-पत्नीचे देहावसान होऊन चार मुली एकाचवेळी अनाथ झाल्या. या घटनेमुळे निमगावसह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या निमगाव येथील अनिल सुदाम सूर्यवंशी (४०) हे पत्नी मंगला (३६) व बालवयात बाळगणाऱ्या चार मुलींसह मोठ्या गोडीगुलाबीने आपला संसार चालवित होते. आपल्या चार लेकीच आपल्या वारसदार राहणार, त्यांच्या खुशीत रममान होऊन अनिलने मुलाच्या कमीचा भास होऊ दिला नाही. अल्पभूधारक असल्याने आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी अनिल अर्जुनी-मोरगाव येथे सलुनची दुकान चालवित होता. घरसंसारामध्ये सुशील स्वभावाची, काबाडकष्ट करणारी पत्नी लाभल्याने त्या दोघांचा संसार हेवा वाटावा असा चालत होता.
आपल्या त्या चार लेकींचे कौतुक बघून ते दोघेही पती-पत्नी आलेल्या अडचणींवर सहजपणे मात करीत होते. असा देखना संसार एका सुखमय वेलीवर फुलत असतानाच काही कळण्यापूर्वीच निष्ठूर काळाने झडप घातली. एप्रिल महिन्यात अनिलची अल्पशा आजाराने प्रकृती खालावली. नागपूरला औषधोपचार सुरु असताना २३ एप्रिल २०१७ रोजी अनिलचे निधन झाले. कुटुंबातील कर्ता, कमविता धन्याचे एकाएकी कुटुंबाला सोडून गेल्याने पत्नी मंगला हिच्यावर मोठे दु:खाचे सावट कोसळले. सोबत असलेल्या चार मुलींचे लालनपालन कसे करायचे, हीच चिंता तिला मनोमन सतावत होती. पती वियोगाचा तिच्यावर जबरदस्त धक्काच बसला. आपल्या कुशीत वाढलेल्या चार मुलींच्या पुढील भविष्याची गोळाबेरीजमध्ये मग्न राहून पतीच्या निधनावर मंगला विरजन टाकण्याचा प्रयत्न करीत होती. आपणच बापाची माया चार मुलींना देऊ, असा निर्धार करून ती मुलींच्या संगतीने जीवन व्यतीत करीत होती. परंतु नियतीला हे मान्य नसावे असेच म्हणावे लागेल.
बापाचे छत्र हरविलेल्या चार लेकींसोबत भावी स्वप्न रंगवित असताणा क्षणार्धात दुष्ट काळाने मंगलाच्या त्या चिमण्या-पाखऱ्यांच्या संसारावर नजर टाकली.
शुक्रवारला घरीच प्रकृती बिघडली. रुग्णालयात नेत असतानाच मंगलाने १९ मेच्या दुपारी ३ वाजता जगाचा निरोप घेतला. ‘आई कुठ’ असा हंबरडा मुलींची फोडला. बालवयात असलेल्या मुलींना आपली जन्मदात्री आई कुठे गेली हे त्यांना कळलेच नाही.
पतीच्या निधनानंतर पत्नी मंगला हिने २५ दिवसानंतर स्वत:ची जीवन यात्रा संपवून त्या चार लेकींना अनाथ केले. बापाची उणीव भासू न देणारी आई कायमची सोडून गेल्याने त्या चारही बहिणींवर दु:खाचे डोंगरच कोसळले. ऐन खेळण्या-बाळगण्याच्या वयामध्ये त्या अभागी बहिणींचे आई-वडिलांचे कृपाछत्रच हरवले. या आघातात त्या चौघ्याही मुली आहेत.
‘त्या’ अनाथ लेकींना नाथांची गरज
खेळण्या-बाळगण्याच्या वयात मायबापाचे छत्र हिरावून गेल्याने सूर्यवंशी परिवारातील त्या चार लेकी अनाथ झाल्या. अनिल व मंगला या दाम्पत्याने जगाचा निरोप घेतल्यानंतर चार बहिणींचा आधारच निघून गेला. मोठी मुलगी मोहिनी ही १७ वर्षांची असून तिने इयत्ता १० वीची परीक्षा दिली आहे. दुसरी स्वाती १५ वर्षांची असून ती नवव्या वर्गात गेली. तिसरी मुलगी जोत्सना १० वर्षांची असून ती पाचव्या वर्गात आहे. शेवटची मुलगी टिष्ट्वंकल केवळ आठ वर्षांची असून यावर्षी तिसऱ्या वर्गात गेली. या चिमण्या-पाखरांना मायबाप सोडून गेल्याने त्या चारही बहिणींसमोर उभे आयुष्य जगण्याची समस्या निर्माण झाली आहे. आई-बापाची सावली त्या दृष्ट काळाने हिरावून नेली. त्यांना मायेची ममता कोण देणार? बापाचे दातृत्व कसे मिळणार? असे नानाविध प्रश्न आजघडीला निर्माण झाले. त्या निरागस चार मुलींचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी, दातृत्वासाठी समाजाची मने हेलावण्याची आज गरज आहे. एकाएकी माय-बापापासून पोरके झालेल्या त्या चार अनाथ मुलींना आधार देण्यासाठी दातृत्वाची गरज आहे. नियतीने असा कसा डाव साधला. २५ दिवसांच्या कालावधीत जन्मदात्या माय-बापापासून पोरके होण्याची वेळ त्या चारही गोंडस बहिणींवर आली. अनाथ झालेल्या त्या लेकींना आधार देण्यासाठी नाथांनी पुढे यावे, अशी जनभावना व्यक्त होत आहे.