सात महिन्यानंतर होणार न.प. स्थायी समितीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:54 PM2018-02-13T23:54:02+5:302018-02-13T23:55:12+5:30
नगर परिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरूवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता नगराध्यक्षांच्या दालनात बोलाविण्यात आली आहे. तब्बल ७ महिन्यांनंतर तीन विषयांवर बोलाविण्यात आलेल्या या सभेला घेऊन नगर परिषदेत विविध चर्चेला उत आले आहे.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : नगर परिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरूवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता नगराध्यक्षांच्या दालनात बोलाविण्यात आली आहे. तब्बल ७ महिन्यांनंतर तीन विषयांवर बोलाविण्यात आलेल्या या सभेला घेऊन नगर परिषदेत विविध चर्चेला उत आले आहे.
महिन्यातून एकदा स्थायी समितीची सभा घेण्यात यावी असा नियम असून तो नगर परिषदेला बंधनकारक आहे. त्यानुसार महिन्यातून एकदा स्थायी समितीची सभा व दोन महिन्यांतून एकदा आमसभा घेतली जाते.गोंदिया नगर परिषदेचा कारभार मात्र अन्य नगर परिषदांपेक्षा वेगळा आहे. येथे स्थायी समिती व आमसभा कधी होणार याचा काहीच नेम नाही. उपाध्यक्षांच्या निवडीवरुन काही नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतल्याने ते एक आयते कारण मिळाले आहे. अशात आमसभा व स्थायी समितीची सभा वाटेल तेव्हा बोलाविली जात असल्याचे खुद पालिकेचे कर्मचारीच बोलत आहेत. गुरूवारी (दि.१५) बोलाविण्यात आलेली स्थायी समितीची सभा तब्बल सात महिन्यांनंतर बोलाविल्याची माहिती आहे. मे महिन्यातील सभेनंतर स्थायी समितीची सभाच झाली नाही. मात्र अचानकच गुरूवारी स्थायी समितीची सभा बोलाविण्यात आल्याने सर्वांनाच आश्चर्य होत आहे. तीन विषयांवर ही सभा बोलाविण्यात आली असून त्यात कमी दराच्या निविदांना मंजुरी देणे, येत्या वर्षाकरिता गुंठेवारी मुदतवाढ मिळणे व बैठकी बाजाराच्या व्यापाऱ्यांना परवाने व ओळखपत्र देणे हे विषय मांडले जाणार आहेत.
हे असू शकते सभा बोलविण्याचे कारण
स्थायी समितीच्या सभेला पूर्वी एका मर्यादीत रकमेपर्यंतच्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार होते. मात्र आता २५ जानेवारीच्या राजपत्रानुसार स्थायी समितीचे अधिकार अमर्यादीत करण्यात आल्याची माहिती आहे. अशात नगर परिषदेत सध्या गाजत असलेला निविदांचा विषय स्थायी समितीच्या सभेत मांडून त्यांना मंजुरी घेण्यासाठी हा सर्व खटाटोप असल्याचा आरोप कंत्राटदारांचा आहे. त्यासाठीच ही सभा बोलाविण्यात आली अशाही चर्चा नगर परिषदेत सुरू आहेत.