सहा तासानंतर बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:29 AM2018-03-28T00:29:03+5:302018-03-28T00:29:03+5:30
मागील काही दिवसांपासून पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांचा जंगलालगत असलेल्या गावाच्या परिसरात वावर वाढला आहे. मंगळवारी (दि.२७) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास एका बिबट्याने तालुक्यातील मुरदोली येथील सुरज डहाके यांच्या घरात ......
ऑनलाईन लोकमत
गोरेगाव : मागील काही दिवसांपासून पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांचा जंगलालगत असलेल्या गावाच्या परिसरात वावर वाढला आहे. मंगळवारी (दि.२७) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास एका बिबट्याने तालुक्यातील मुरदोली येथील सुरज डहाके यांच्या घरात प्रवेश करुन तब्बल सहा तास घरात बस्तान मांडले होते. दरम्यान वन्यजीवप्रेमी व वनविभागाच्या परिश्रमानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. तब्बल सहा तासांच्या मोहिमेनंतर डहाके कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या दरम्यान झालेल्या झटापटीत बिबट्याने तीन जणांना जखमी केले.
प्राप्त माहितीनुसार गोरेगाव वनपरिक्षेत्रातंर्गत मुरदोली येथील एका घरात बिबटाने तीन लोकांना जखमी करीत स्वत:चा जीव वाचविण्यासाठी घरात बस्तान मांडले. यातील दोन्ही जखमींना राजकुमार सलामे व रंजीत कोडवते यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्राधिकारी जाधव, वन्यजीव नागझिराचे सचिन शिंदे, पोलीस निरीक्षक नारनवरे यांनी घटनास्थळी येवून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. बिबटाला पिंजऱ्यात कैद करण्यासाठी वनवभिगाने शर्तीचे प्रयत्न केले. मात्र बिबटाने झुडकूटोला जंगलाकडे पळ काढला.त्याआधी वनविभागाने डाहाके यांच्या घरासमोरील दारासमोर दोन पिंजरे ठेऊन व घराच्या छतावर जाळे टाकून बिबटाला पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र बिबटाने घराच्या मागच्या बाजुच्या कोपऱ्यांवरुन डाव साधत जंगलाकडे पळ काढला. पळ काढताना बिबट्याने वन्य विभागाच्या एनजीओ कर्मचाऱ्यांला सुध्दा जखमी केले. मुरदोली हे गाव नवेगावबांध-नागझिरा अभयारण्याला लागून आहे. त्यामुळे या भागात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. पाण्याच्या शोधात बिबट्या गावाकडे भटकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.