सहा वर्षांनंतर उडाला बैलगाडी शर्यतीचा धुरळा; १०८ बैलजोड्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2022 05:13 PM2022-04-19T17:13:01+5:302022-04-19T17:34:59+5:30
नवेगावबांध येथे तब्बल सहा वर्षांनंतर बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडाला. यामुळे पट शौकिनांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
नवेगावबांध (गोंदिया) : तब्बल सहा वर्षांनंतर बैलगाडा शर्यतीचे आयोजन नवेगावबांध येथील बैलगाडा शर्यत समितीद्वारा आयोजित करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
या शर्यतीकरिता १०८ बैलजोड्यांनी बैलगाडा शर्यतीत भाग घेतला. नवेगावबांध या ठिकाणी दरवर्षी संक्रांतीमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात होते. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत या ठिकाणी भरविली जात होती. काही दिवसांनंतर या ठिकाणी पटाची जागा इतर शासकीय कार्यालयासाठी देण्यात आल्याने व काही जागेवर अतिक्रमण झाल्याने पट भरविणे संपुष्टात आले होते, नंतर पुन्हा या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले, परंतु उच्च न्यायालयाच्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीनुसार हे सर्व बंद झाले होते. पुन्हा एकदा यावरील बंदी उठविल्यानंतर नवेगावबांध येथे तब्बल सहा वर्षांनंतर बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडाला. यामुळे पट शौकिनांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तीन राज्यांतील, तसेच विदर्भातील भंडारा, गोंदिया, अमरावती या तीन राज्यांतील १०८ बैलजोड्यांनी या शर्यतीत भाग घेतला होता. ४५ सेकंदांच्या आत आलेल्या ८६ जोड्या अंतिम फेरीत उतरल्या. त्यापैकी सात बैलजोड्यांना रोख पारितोषिके देण्यात आली.
उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे यांच्या हस्ते झेंडा पूजन करून करण्यात आले. यावेळी सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार उपस्थित होते. विजेत्या बैलजोड्यांना उपसरपंच रघुनाथ लांजेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नवल चांडक विलास कापगते जगदीश पवार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. टिकाराम संग्रामे, जगदीश पवार, खुशाल काशीवार, पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे, नंदागवळी यांनी निर्णायक मंडळाचे काम पाहिले.