दीड वर्षानंतर आजपासून वाजणार शाळांची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 05:00 AM2021-10-04T05:00:00+5:302021-10-04T05:00:20+5:30
जिल्ह्यात १६६३ एकूण शाळा आहेत; परंतु वर्ग पाचवी ते १२ वीच्या शाळाच सुरू राहणार असल्याने ग्रामीण भागातील वर्ग पाचवी ते १२वीच्या १०२६ शाळा; तर शहरी भागातील आठवी ते १२ वीच्या १२३ शाळा सुरू राहणार आहेत. यात ग्रामीण भागातील पाचवी ते ७वीचे ४१ हजार ६३३ विद्यार्थी, तर आठवी ते १२वीचे ६४ हजार ३८८ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. शहरी भागातील वर्ग आठवी ते १२ वीचे २९ हजार ४९८ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर आज, सोमवारपासून (दि. ४) शहरी आणि ग्रामीण भागांतील जिल्ह्यातील ११५९ शाळा सुरू होत आहेत. कोरोनाच्या सावटाखाली या शाळा सुरू होत असल्याने मुख्याध्यापक आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक कामाला लागल्याचे चित्र होते. ७ ऑक्टोबरपासून मंदिराचे द्वार उघडणार असल्याने शाळा आणि मंदिराची घंटा वाजण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य सरकारने वर्ग पाचवी ते सातवीच्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या निर्णय घेतल्याने गोंदिया जिल्ह्यातील ११४९ शाळा सुरू होणार आहेत. या शाळांत जिल्ह्यातील एक लाख ३५ हजार ५१९ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत.
जिल्ह्यात १६६३ एकूण शाळा आहेत; परंतु वर्ग पाचवी ते १२ वीच्या शाळाच सुरू राहणार असल्याने ग्रामीण भागातील वर्ग पाचवी ते १२वीच्या १०२६ शाळा; तर शहरी भागातील आठवी ते १२ वीच्या १२३ शाळा सुरू राहणार आहेत. यात ग्रामीण भागातील पाचवी ते ७वीचे ४१ हजार ६३३ विद्यार्थी, तर आठवी ते १२वीचे ६४ हजार ३८८ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. शहरी भागातील वर्ग आठवी ते १२ वीचे २९ हजार ४९८ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत.
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे करावे लागणार पालन
- आज, सोमवारपासून शाळा सुरू असून यासाठी शासनाने शाळांना काही नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यात शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करण्याचे तसेच प्रत्येक विद्यार्थ्याचे नियमित तापमान मोजणे व प्रवेशद्वारावरच त्यांचे सॅनिटायझिंग करण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. तसेच सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. शाळा सुरुवात होताच दोन आठवडे अभ्यासाला सुरुवात न करता खेळमेळीच्या वातावरणात शिकविण्याचे निर्देश दिले आहे.
दिवाळीनंतर वर्ग पहिली ते चौथीच्या उघडणार शाळा
- शिक्षण अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी ३० सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्या बैठकीत वर्ग पहिली ते चौथीच्या शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
विद्यार्थी व पालकांनाही उत्सुकता
- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या नाहीत; त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणावरच अवलंबून राहावे लागत होते. या प्रकाराने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही कंटाळले होते. मात्र आता आज, सोमवारपासून प्रत्यक्षात शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. पालकांना उत्सुकता असली तरी तेवढीच काळजीदेखील कायम आहे.
मंदिराबाबत अद्याप मार्गदर्शक सूचना नाही
- राज्य सरकारने ७ ऑक़्टोबरपासून मंदिर उघडण्याचे निर्देश दिले आहे. मात्र मंदिरात भाविकांना प्रवेश देताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी सविस्तर मार्गदर्शक सूचना काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.