अवकाळी पुन्हा बरसला
By Admin | Published: April 6, 2016 01:49 AM2016-04-06T01:49:35+5:302016-04-06T01:49:35+5:30
मागच्या आठवड्यात दमदार हजेरी लावल्यानंतर अवकाळी पावसाने सोमवारी (दि.४) जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली.
आमगाव तालुक्यात सर्वाधिक : काही ठिकाणी झाली गारपीट
गोंदिया : मागच्या आठवड्यात दमदार हजेरी लावल्यानंतर अवकाळी पावसाने सोमवारी (दि.४) जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली. विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह अवकाळी बरसला. यात गोरेगाव, सालेकसा व आमगाव तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. विशेष म्हणजे वादळी वाऱ्याने घरावरचे व टपऱ्यांचे छत उडून काही भागांत नुकसान झाल्याचीही माहिती आहे.
दुपारपासून वादळी वातावरणासह सायंकाळी अचानक वाऱ्याने हजेरी लावली. त्यानंतर रात्री पाऊस बरसला. जिल्ह्यात गोंदियासह तिरोडा, अर्जुनी-मोरगाव व देवरी तालुक्यांत पावसाचे थेंब पडले. तर गोरेगाव, सालेकसा, आमगाव व सडक- अर्जुनी तालुक्यात चांगलाच पाऊस बरसल्याची नोंद आहे. या पावसामुळे काही भागात घरे व टपऱ्यांवरचे छत उडाल्याची माहिती आहे. सोमवारी बरसलेल्या या पावसात आमगाव तालुक्यात सर्वाधीक ९.३ मिमी पाऊस बरसल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे शहरात मंगळवारी (दि.५) सकाळपासून वादळी वातावरण होते व वारा सुरू होता. तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे सायंकाळी गारांसह चांगला पाऊस बरसला. या अवकाळी पावसामुळे मात्र रबी पिकांना धोका निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)
वादळी वाऱ्याचा फटका
सालेकसा- वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील ग्राम लटोरी येथील आेंकारदास मिथलादास निंबार्क यांच्या घरावर शेजारच्या घराचे टीनाचे शेड व इतर साहीत्य धडकल्याने कौलारू घराचे मोठे नुकसान झाले आहे.ओंकारदास यांचे कौलारू घर असून त्यांच्या शेजारच्या घरावरचे टीनचे शेड, लोखंडी पाईप व अन्य साहीत्य वादळी वाऱ्याच्या धडाक्यात निघून गेले व ओंकारदास यांच्या घरावर पडले. त्यामुळे घरावरील केवलू फुटले. एवढेच नव्हे तर कवेलू खालील शिवारसुद्धा तुटले. त्यामुळे ओंकारदास यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच कवेलू फुटल्याने पावसाचे पाणीसुद्धा घरात शिरले. त्यामुळे घरातील वस्तूही खराब झाल्या.