मध्य प्रदेशातील प्रवेशबंदीमुळे आगाराला १० लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:18 AM2021-07-24T04:18:34+5:302021-07-24T04:18:34+5:30
कपील केकत गोंदिया : कोरोना प्रादुर्भाव पाहता, मध्य प्रदेश शासनाने महाराष्ट्रातील बसेसला लावलेली प्रवेशबंदी आणखी वाढविली आहे. परिणामी, एप्रिल ...
कपील केकत
गोंदिया : कोरोना प्रादुर्भाव पाहता, मध्य प्रदेश शासनाने महाराष्ट्रातील बसेसला लावलेली प्रवेशबंदी आणखी वाढविली आहे. परिणामी, एप्रिल महिन्यापासून आगाराच्या मध्य प्रदेश राज्यात जाणाऱ्या फेऱ्या बंद आहेत. अशात आगाराला या महिन्यांत सुमारे १० लाख रुपयांचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, फेऱ्या बंद असल्यामुळे मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातील प्रवाशांचीही चांगलीच अडचण होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला बघता मध्य प्रदेश शासनाने एप्रिल महिन्यातच महाराष्ट्रातील बसेसला प्रवेशबंदी केली होती. त्यात मध्य प्रदेश शासनाकडून दिवसेंदिवस वाढ केली जात आहे. २१ जुलैपर्यंत असलेली ही प्रवेशबंदी आत वाढवून २८ जुलैपर्यंत करण्यात आली असून, एकंदर हा महिनाही गेला. अशात मागील ४ महिन्यांपासून प्रवेशबंदी असल्यामुळे गोंदिया आगाराला दरमहा सुमारे २.५० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. म्हणजेच, एप्रिल, मे, जून व आता जुलै अशा या ४ महिन्यांत आगाराला सुमारे १० लाख रुपयांचा फटका बसणार आहे.
मध्य प्रदेश राज्याची सीमा येथून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असून, गोंदियाची बाजारपेठ ‘मिनी मुंबई’ म्हणून ओळखली जात असल्याने, मध्य प्रदेश राज्यातील नागरिक खरेदीसाठी येथेच येतात, शिवाय गोंदिया व बालाघाट जिल्ह्याचे नातेही जुने असल्याने नागरिकांनी रोजची ये-जा सुरूच असते. मात्र, मध्य प्रदेश शासनाच्या निर्णयामुळे बसफेऱ्या बंद असून, यामुळे दोन्ही राज्यांतील नागरिकांचीच अडचण होत आहे.
-------------------------
आगाराच्या आहेत २७ फेऱ्या
गोंदिया आगारातून मध्य प्रदेशात दररोज २७ फेऱ्यांचे नियोजन आहे. यात १९ फेऱ्या बालाघाट, १ फेरी लांजी, ५ फेऱ्या रजेगाव तर २ फेऱ्या मलाजखंडच्या आहेत. अशा एकूण २७ फेऱ्या आगारातून मध्य प्रदेश राज्यात सोडल्या जात होत्या. मात्र, कोरोनामुळे फेऱ्यांवर बंदी असल्यामुळे दोन्ही राज्यांतील नागरिकांची प्रवासाला घेऊन अडचण होत आहे. विशेष म्हणजे, मध्य प्रदेशातील नागरिकांना खरेदी, उपचार व नात्यागोत्यांसाठी गोंदियात यावे लागते, शिवाय नागपूर येथे कामानिमित्त जावे लागत असून, त्यांच चांगलीच अडचण होत आहे.
---------------------------
गोंदिया-बालाघाटचे रोटी-बेटीचे नाते
गोंदिया व बालाघाट या दोन्ही जिल्ह्यांचे व्यावसायिक संबंध असतानाच, रोटी-बेटीचे नातेही या दोन जिल्ह्यांत आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील कित्येकांचे नातेवाईक येथे आहेत, शिवाय गोंदियाची बाजारपेठ मोठी असल्याने बालाघाट व गोंदियाचे व्यावसायिक संबंधही आहेत. मात्र, कोरोनाच्या ग्रहणामुळे यावर परिणाम जाणवत आहे. ज्यांच्याकडे खासगी वाहन आहेत, त्यांचे ठीक आहे. मात्र, ज्यांना एसटीनेच प्रवास करावा लागत होता, त्यांची अडचण होत आहे.
रोटी-बेटीचे नाते