आगाराने मालवाहतुकीतून मिळविले १२ लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:27 AM2021-05-22T04:27:16+5:302021-05-22T04:27:16+5:30
गोंदिया : कोरोनामुळे मागील वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये रस्ते परिवहन महामंडळाला चांगलाच फटका बसला होता. अशात उत्पन्नासाठी महामंडळाने मालवाहतुकीचा ...
गोंदिया : कोरोनामुळे मागील वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये रस्ते परिवहन महामंडळाला चांगलाच फटका बसला होता. अशात उत्पन्नासाठी महामंडळाने मालवाहतुकीचा प्रयोग सुरू केला होता. आता यंदा पुन्हा लॉकडाऊनमुळे महामंडळ अडचणीत आले आहे. मात्र, गोंदिया आगाराने मालवाहतुक सुरूच ठेवली असून, मागील मे महिन्यापासून आतापर्यंत ९० डिलिव्हरीतून ११ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये शासनाने प्रवासावर बंदी लावल्याने रेल्वे व एसटीसह अन्य सर्वच प्रवासी सुविधा बंद होत्या. याचा राज्य रस्ते परिवहन महामंडळाला जबर फटका बसला होता. मात्र, झालेले नुकसान कसे तरी भरून काढण्यासाठी महामंडळाने लालपरीचा उपयोग मालवाहतुकीसाठी करून त्यातून काही उत्पन्न काढण्यासाठी प्रयोग सुरू केला होता. त्यानुसार गोंदिया आगारानेही मालवाहतूक सुरू केली होती. यात गोंदिया आगाराने मागील मे महिन्यापासून सुरू केलेली मालवाहतूक अद्याप सुरूच असून, या मे महिन्यापर्यंत ११ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. यात आगाराने ९० डिलिव्हरी केल्या आहेत.
आजघडीला कोरोनाच्या धास्तीने नागरिकांनी प्रवास टाळला असल्याने बस स्थानकातच उभ्या आहेत. परिणामी आगाराला यंदाही चांगलाच फटका बसत आहे. आगाराची बस सोडण्याची तयारी आहे. मात्र, प्रवासीच नसल्याने बस स्थानकातच उभ्या राहत असून, उत्पन्न शून्य झाले आहे. अशात आता आगाराकडून मालवाहतुकीवर जोर दिला जात असून, काही तरी हाती यावे यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
----------------------------------
२० दिवसांत १४ डिलिव्हरी
आगारातील प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद पडून असल्याने आगाराने मालवाहतुकीवर जोर दिला आहे. मालवाहतुकीतून उत्पन्न मिळविण्यासाठी आगाराची धडपड सुरू आहे. यात आगाराने मे महिन्यातील २० दिवसांत १४ डिलिव्हरी केल्या असून, त्यातून ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. यात आगाराने नागपूर, तुमसर, रामटेक व अमरावती येथे मालवाहतूक केली आहे. एसटीद्वारे होणारी मालवाहतूक पूर्णपणे भरवशाची असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असेही आगार प्रमुख संजना पटले यांनी सांगितले आहे.
-----------------------------------
तिरोडा आगाराच्या ५ डिलिव्हरी
मालवाहतुकीचा हा प्रयोग तिरोडा आगारानेही सुरू केला असून वर्षभरात ७३ डिलिव्हरी केल्या असून, त्यातून तीन लाख ७९ हजार ७२ रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे, तर यंदा मे महिन्यातील या २० दिवसांत आगाराने ५ डिलिव्हरी केल्या असून, त्यातून २९ हजार ५० रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे तिरोडा आगार प्रमुख पंकज दांडगे यांनी कळविले आहे.