कृषी पर्यटन दृष्टिपथास

By admin | Published: July 1, 2014 01:31 AM2014-07-01T01:31:59+5:302014-07-01T01:31:59+5:30

पूर्व विदर्भातील ९० टक्के शेतकरी अजूनही परंपरागत शेतीतच गुरफटलेले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी तर निव्वळ धानाच्या उत्पादनावर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीतून

Agricultural Tourism Scenery | कृषी पर्यटन दृष्टिपथास

कृषी पर्यटन दृष्टिपथास

Next

निधीचा अभाव : कारंजात १६ एकरात साकारणार पर्यटनाची योजना
नरेश रहिले - गोंदिया
पूर्व विदर्भातील ९० टक्के शेतकरी अजूनही परंपरागत शेतीतच गुरफटलेले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी तर निव्वळ धानाच्या उत्पादनावर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीतून सहज विकास साधता यावा यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला असून शेतकऱ्यांपुढे कृषी पर्यटनाचा पर्याय ठेवला जात आहे.
गोंदिया शहरापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या कारंजा येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या परिसरात ३५ एकर जागेपैकी १६ एकर जागेत कृषी पर्यटन प्रकल्प राबविण्याची संकल्पना जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी मांडली. एवढेच नाही तर ही कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत.
या कृषी पर्यटनासाठी १६ एकर जागेत बागायती फळ लागवड करुन ती पिके पाहण्यासाठी किंवा सकाळ संध्याकाळ या परिसरात इच्छुकांना भ्रमंती करण्यासाठी हा परिसर खुला करण्यात येणार आहे. त्यासाठी सेंट्रल पंप हाऊस बसविण्यात आले आहे. त्या पंप हाऊसला तीन जलस्त्रोताने जोडण्यात आले आहे. दोन बोअरवेल व एक विहिरील पाणी या सेंट्रल पंप हाऊसमध्ये आणले जाईल. दीड लाख लिटर पाण्याचा साठा राहील. एवढे पंपहाऊस उभारण्यात आले आहे. खत व पाणी ड्रिपलाईनने फळबागांना देण्यात येणार आहे.
या फार्ममध्ये फेरफटका मारण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. या १६ एकरात डाळींबं, सीताफळ, पेरू, आंबा याचे उत्पादन घेण्यात येणार आहे. यासाठी अनेक गोष्टी स्वयंचलित यंत्रणेशी जोडल्या जाणार आहेत. याशिवाय या फळबागांना सतत पाणी मिळावे यासाठी पावणे दोन कोटी लिटर क्षमतेचा तलाव पाणीसाठा करून ठेवण्यासाठी उभारण्यात आला आहे. या तलावात बाहेरचे मासे बोलावून छंद म्हणून पर्यटकांना मासेमारी करण्याची परवानगी कृषी विभाग देणार आहे.
या तलावासाठी नियमित निधीतून पाच लाख रुपये खर्च करण्यात आले. जिल्ह्याच्या कृषी व्यवस्थापनाकरिता आलेल्या ४० लाखांच्या निधीपैकी काही निधी या ठिकाणी खर्च करण्यात आला आहे. या कृषी पर्यटनात तीन किलोमिटरचा रस्ता तयार होणार असून गिट्टी व मुरूम टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहिण्यात आले आहे.
कृषी पर्यटनासाठी शासनाकडून दुसरे स्वतंत्र अनुदान नसले तरी कृषी विभागाला असलेल्या नियमित निधीतूनच कृषी पर्यटनाची संकल्पना साकारणार असल्याची माहिती अशोक कुरील यांनी दिली.
याठिकाणी पिक पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी जिल्ह्यातील कृषीसंबंधी अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.
याठिकाणी हवेतून व सौरऊर्जेतून एक किलो वॅट विजनिर्मिती करण्यात येणार आहे. ही वीज तेथील उपकरणे व कार्यालयातील कामासाठी वापरण्यात येणार आहे.

Web Title: Agricultural Tourism Scenery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.