वेतनासाठी मंडळ कृषी अधिकाऱ्याचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:22 PM2019-02-25T22:22:41+5:302019-02-25T22:23:03+5:30
मंडळ कृषी अधिकारी विठ्ठल कवठे हे मागील पाच महिन्यापूर्वी गोरेगाव येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात रूजू झाले. मात्र पाच महिन्याचा कालावधी लोटूनही त्याचे वेतन अद्यापही काढण्यात आले नाही. त्यांनी यासंदर्भात संबंधिताकडे पाठपुरावा केला. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी सोमवारपासून (दि.२५) तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : मंडळ कृषी अधिकारी विठ्ठल कवठे हे मागील पाच महिन्यापूर्वी गोरेगाव येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात रूजू झाले. मात्र पाच महिन्याचा कालावधी लोटूनही त्याचे वेतन अद्यापही काढण्यात आले नाही. त्यांनी यासंदर्भात संबंधिताकडे पाठपुरावा केला. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी सोमवारपासून (दि.२५) तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुका कृषी अधिकारी, गोरेगाव पोलीस स्टेशन यांना दिलेल्या निवेदनानुसार विठ्ठल कवठे २४ सप्टेबर २०१८ ला गोरेगाव येथे मंडळ कृषी अधिकारी म्हणून रूजू झाले. मला शासकीय नियमानुसार वेतन मिळणे गरजेचे होते. पंरतू कनिष्ठ लिपीक यांनी वेतन प्रक्रियेविषयी दिशाभूल केल्याने ५ महिन्यापासून वेतन माझ्या बँक खात्यावर जमा झाले नाही. त्यामुळे मला विविध आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी तुमडाम यांना सुध्दा याची माहिती दिली होती. मात्र त्यांनी सुध्दा याकडे दुर्लक्ष केल्याने अद्यापही मला पीएनआर क्रमांक मिळाला नाही. कनिष्ठ लिपिक राजेश फाये यांनी सांगीतले मंडळ कृषी अधिकारी विठ्ठल कवठे यांच्या पीएनआर क्रमांकासाठी माहीती पाठविली असल्याचे सांगितले. मात्र जोपर्यंत आपल्या बँक खात्यावर वेतनाची रक्कम जमा होत नाही तोपर्यंत आपले उपोषण सुरू राहणार असल्याचे कवठे यांनी सांगितले. विशेष म्हणजे कृषी विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यालाच वेतन होत नाही म्हणून उपोषणाला बसावे लागत असेल तरी या कार्यालयातून शेतकऱ्यांची कामे किती काळजीने होत असतील याबाबत शंका आहे.
शासकीय सेवेत नव्याने रूजू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पीएनआर क्रमांक जनरेट झाल्याशिवाय त्यांच्या बँक खात्यावर वेतन जमा होत नाही. मी नुकताच येथे रूजू झालो असून याची चौकशी करुन कवठे यांची समस्या मार्गी लावू.
- अशोक मोरे
तालुका कृषी अधिकारी गोरेगांव