कृषि संजीवनी मोहिमेला सोमवारपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:21 AM2021-06-18T04:21:05+5:302021-06-18T04:21:05+5:30
गोंदिया : १ जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी राज्यात विविध कृषी विषयक ...
गोंदिया : १ जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी राज्यात विविध कृषी विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्तवतीने कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहीम २१ जून ते १ जुलै या कालावधीत राबविण्यात येत आहे.
या मोहिमेत शेतकरी मेळावे, शिवारफेऱ्या, गावबैठका, शेतीशाळा, प्रशिक्षणे, परिसंवाद, कार्यशाळा, पीक प्रात्यक्षिके यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुक्यातील पीकस्पर्धा विजेते, कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, प्रयोगशील व उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सहभागाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यालयीन दिवशी महत्वाचे तंत्रज्ञान व मोहिमांवर विशेष भर देऊन प्रचार, प्रसार व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांनी कळविले आहे. शेतीसाठीच्या आधुनिक तंत्रज्ञान, यशोगाथा व कृषी विभागाच्या विविध योजना यांच्या प्रसारासाठी विविधश समाज माध्यमांचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कृषीक ॲप, जिल्ह्याचा युट्यूब चॅनल, फेसबुक पेज, व्हॉटसॲप, ब्लॉगस्पॉट यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यत पोहचण्यासाठी या मोहिमेमध्ये त्यांचा प्रसार करण्यात येणार आहे. कृषीक ॲपच्या वापरामध्ये जिल्हा महाराष्ट्रात तिसरा तर विदर्भामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.
------------------------
असे आहे कार्यक्रमांचे नियोजन
कृषि संजीवनी मोहिमेमध्ये २१ जून रोजी बी.बी.एफ. लागवड (रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान), २२ जून रोजी
बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक, २३ जून रोजी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलीत वापर, २४ जून रोजी सुधारित भात लागवड तंत्रज्ञान प्रसार, २८ जून रोजी मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, २९ जून रोजी तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढ करण्यासाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, ३० जून रोजी महत्वाच्या पिकांची किड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना व प्रसार तसेच मोहिमेची सांगता १ जुलै रोजी कृषी दिनाच्या आयोजनाने होणार आहे.