कृषी केंद्र संचालकांचा कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:08 AM2017-11-03T00:08:20+5:302017-11-03T00:08:32+5:30
परवानगी नसलेल्या कंपनीची कीटकनाशके फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील २० शेतकºयांचा बळी गेला. या घटनेला जबाबदार धरुन कृषी केंद्र संचालकावर फौजदारी कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : परवानगी नसलेल्या कंपनीची कीटकनाशके फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील २० शेतकºयांचा बळी गेला. या घटनेला जबाबदार धरुन कृषी केंद्र संचालकावर फौजदारी कारवाई करण्यात आली. या कारवाईचा निषेध नोंदविण्यासाठी राज्यातील सर्व कृषी केंद्र संचालकांनी गुरूवार (दि.२) पासून तीन दिवस कृषी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात जिल्ह्यातील सर्व ७५० कृषी केंद्र संचालकांनी सहभाग घेतला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात परवानगी नसलेल्या कंपन्याच्या कीटकनाशकांची फवारणी केल्याने २० शेतकºयांचा बळी गेला. त्यानंतर विदर्भात इतर ठिकाणी कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झाल्याच्या घटना पुढे आल्या. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. शेतकºयांची यावर ओरड वाढल्यानंतर शासन आणि प्रशासनाने याची दखल घेत कृषी केंद्रावर धाडी टाकून कृषी केंद्र संचालकांवर मोक्का अंतर्गत फौजदारी कारवाई केली. यामुळे कृषी केंद्र संचालकाचे धाबे दणाणले आहे. कृषी विभागातर्फे कृषी केंद्र संचालकांना जबाबदार धरुन केली जात असलेली कारवाई अयोग्य आहे. ज्या कंपन्याच्या कीटकनाशकांना विक्रीची परवानगी नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून कृषी केंद्र संचालकांना बळीचा बकरा बनविल्या जात असल्याचा आरोप महाराष्टÑ फर्टिलाईजर्स संघटनेने केला. कृषी विभागाने खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच धाड सत्र राबवून कीटकनाशकांची तपासणी केली असती तर आज ही वेळ आली नसती. मात्र शासन आणि प्रशासन स्वत:च्या चुकीचे खापर कृषी केंद्र संचालकांवर फोडत असल्याचा आरोप कृषी केंद्र संचालकांनी केला आहे.
कृषी केंद्र संचालकांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात यावी. यासह अन्य मागण्यांना घेवून राज्यभरातील कृषी केंद्र संचालकांनी गुरूवार (दि.२) पासून सलग तीन दिवस प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यात एकूण ९५० परवानाधारक कृषी केंद्र आहेत. यापैकी सध्या स्थितीत ७५० कृषी केंद्र सुरू असून या सर्वांनी संघटनेच्या आवाहनाला समर्थन देत कृषी केंद्र बंद ठेवली.
यासंदर्भात संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष विजू परमाका यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संघटनेच्या निर्णयानुसार सर्व कृषी केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. संघटनेचा जो निर्णय होईल त्यानुसार पुढीेल कार्यक्रम ठरविला जाणार असल्याचे सांगितले.
कृषी विभागाची बघ्याची भूमिका
यंदा धानपिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला. अशा स्थितीत कीडरोग नियंत्रणासाठी कोणत्या कीटकनाशकांची फवारणी करायची याचे मार्गदर्शन शेतकºयांना करुन ती सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्याचे काम कृषी विभागाचे आहे. मात्र हा विभाग केवळ प्रसिध्दपत्रक काढून आवाहन करण्यातच समाधान मानत असल्याचे चित्र आहे.
शेतकरी अडचणीत
कमी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील धानपिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कीटकनाशके खरेदी करुन कीडरोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. मात्र गुरूवार(दि.२)पासून कृषी केंद्र संचालकांनी तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कीटकनाशके खरेदीसाठी येणाºया शेतकºयांना आल्यापावलीच परत जावे लागत आहे.