विमान प्राधिकरणातर्फे जमिनीचा ताबा घेण्यास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 10:23 PM2018-12-20T22:23:25+5:302018-12-20T22:23:59+5:30
तालुक्यातील बिरसी येथे विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रकल्पाने भुसंपादीत केलेली ४१ हेक्टर जमिन ताब्यात घेण्यास सुरूवात केली. मात्र याला शेतकऱ्यांनी विरोध करीत नियमबाह्यपणे जमिन ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खातीया : तालुक्यातील बिरसी येथे विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रकल्पाने भुसंपादीत केलेली ४१ हेक्टर जमिन ताब्यात घेण्यास सुरूवात केली. मात्र याला शेतकऱ्यांनी विरोध करीत नियमबाह्यपणे जमिन ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप केला. यामुळे गुरूवारी (दि.२०) या ठिकाणी थोडा तणाव निर्माण झाला होता.
बिरसी विमानतळ प्रशासनाच्या वतीने पोलीस कर्मचाºयांच्या उपस्थितीत कामठा-परसवाडा या मार्गाला लागून असलेली ४१ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यास सुरूवात केली. या वेळी बुलडोजर लावून जमिनीचे सपाटीकरण करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. दरम्यान या वेळी काही शेतकऱ्यांनी याला विरोध केला. प्राधिकरणाकडून जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नसून या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल आहे. शेतकऱ्यांना एकरी ९ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी त्यानंतरच जमिनीचा ताबा घेण्यात यावा अशी मागणी केली. तर काही शेतकऱ्यांनी आपल्याला अद्यापही जमिनीचा मोबदला मिळाला नसून बळजबरीने जमिनी ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप केला. विमानतळ प्राधिकरणाने नियमानुसार ही जमीन प्राधिकरणाच्या नावे झाली असून भूसंपादन अधिनियमानुसार जमिन ताब्यात घेतली जात असल्याचे सांगितले.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बिरसी विमानतळ प्राधिकरणाने शेतकºयांना योग्य मोबदला द्यावा. त्यानंतरच जमीन ताब्यात घेण्यात यावी.
- मनोज दहीकर, शेतकरी व कृउबास संचालक.
..................................
बिरसी विमानतळ प्राधिकरणाने शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना दिला. मात्र काही शेतकरी या विरोधात न्यायालयात गेले आहे. पण सदर जमीन ही प्राधिकरणाच्या नावावर झाली असून भुसंपादन अधिनियमानुसारच ती आता ताब्यात घेतली जात आहे. यात कुठल्याची नियमाचे उल्लघंन करण्यात आले नाही.
- सचिन खंगार, संचालक बिरसी विमानतळ.