भाजप नगरसेवकाच्या अपघाती मृत्यूवरून आकांडतांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 09:54 PM2018-05-21T21:54:23+5:302018-05-21T21:54:42+5:30
येथील भाजपचे नगरसेवक माणिक मसराम यांचा सोमवारी (दि.२१) मध्यरात्री दरम्यान अपघाती मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मृतकाच्या पत्नीने केला. जोपर्यंत संशयीत आरोपीवर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : येथील भाजपचे नगरसेवक माणिक मसराम यांचा सोमवारी (दि.२१) मध्यरात्री दरम्यान अपघाती मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मृतकाच्या पत्नीने केला. जोपर्यंत संशयीत आरोपीवर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेहाची उत्तरीय तपासणी करु देणार नाही. असा आक्रमक पवित्रा समाजबांधवांनी घेतला. अखेर संशयित आरोपी म्हणून भाजपचे नगरसेवक देवेंद्र टेंभरे यांना ताब्यात घेण्यात आले. माजी खा. नाना पटोले यांनी जमावाची समजूत घातल्यानंतर उत्तरीय तपासणी करण्यात आली. मात्र वृत्त लिहेस्तोवर उत्तरीय तपासणी झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाही. परिस्थिीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांची अतिरीक्त कुमक मागविण्यात आली आहे.
मृतक हे स्थानिक नगरपंचायतचे नगरसेवक आहेत. येत्या २५ मे रोजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार होती. नगराध्यक्ष पदाचा नाामाकंनपत्र भरण्याची सोमवार (दि.२१) ही अंतीम मुदत होती. त्यादृष्टीने पक्षातील खलबते व नगराध्यक्ष बनण्याची नगरसेवकात चढाओढ सुरु होती. नगरसेवक देवेंद्र टेंभरे हे माझे पतीला गेल्या ८ दिवसांपासून भ्रमणध्वनीवर बोलायचे. अनेक प्रसंगी त्यांना रात्री-बेरात्री सोबत घेऊन जायचे. रविवारी (२०) टेंभरे हे मृतकाचे दुकानात गेले व स्वत:च्या चारचाकी वाहनाने लाखांदूरला घेऊन गेले. मृतक व संशयीत हे दोघेही नगराध्यक्ष पदाचे दावेदार होते. यातूनच त्यांनी कटकारस्थान करुन त्यांची हत्या केली. त्यांचेवर गुन्हा दाखल करुन अटक करावी तसेच त्यांचेसोबत असणारे नगरसेवक एसकुमार शहारे, माणिक घनाडे, विजय कापगते, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमाकांत ढेगे यांची सखोल चौकशी करण्याची मागणी मृतकाची पत्नी मनिषा मसराम यांनी पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे केली आहे.
मृतक माणिक हा रविवारी लाखांदूरला गेला होता. त्यानंतर रात्री स्थानिक एका पेट्रोलपंपावर त्यांनी भोजन केले. रात्री १२ चे सुमारास तो घरी गेला. भाचा मुकेश सिडाम याला दुचाकीची चाबी मागितली. त्याने एवढ्या रात्री कुढे जात आहात म्हणून चाबी देण्यास नकार दिल्याने त्याचे श्रीमुखात हाणले व तो निघून गेल्याच्या येथे चर्चा आहेत. स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी मृतकाचे शेत आहे. मात्र शेतात सध्या कुठलेही पिक नाही. अशा परिस्थितीत मृतक हा त्या दिशेने एवढे रात्री कसा गेला? हे एक कोडेच आहे. ग्रामीण रुग्णालयाचे पुढे गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला दुचाकीसह मृतदेह आढळून आला. मृतकावर ही दुचाकी पडलेली असल्याचे सोमवारी सकाळी निदर्शनास आले. पोलिसांना ही माहिती कळली. त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र पोलिसानी पंचनामा न करताच मृतदेह कसा उचलला यावरुन शंका उत्पन्न करण्यात आली. बघता बघता याच मुद्यावरुन समाजबांधव पोलीस ठाण्यात गेले. ठाणेदार प्रशांत भस्मे यांनी त्यांची समजूत घातली. त्यानंतर आरोपांचे निवेदन देण्यात आले. दुसरीकडे काही समाजबांधव ग्रामीण रुग्णालयातील शवागाराकडे गेले व त्यांनी जोवर संशयीत अटक होणार नाही तोपर्यंत श्वविच्छेदन होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्र घेतला. देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी जमावाची समजूत घातली. मात्र जमाव शांत होत नव्हता. वृत्त लिहेस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुच होती. त्यामुळे कुणावर गुन्हे दाखल झाले ते कळू शकले नाही.
अन् एसपी पायी गेले
जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी अपघात स्थळाची पाहणी केली. जमावाची समजूत घातली. अटक केलेल्या संशयीत आरोपीला दाखवा अशी मागणी जमावाने केली. तेव्हा ते तयार झाले. ते आपल्या वाहनात बसत असतांना तुम्ही वाहनात आम्ही पायी-पायी कसे? असा सवाल जमावाने करताच एसपीनी मी पण तुमच्या सोबत पायी-पायी येतो. अशी भूमिका घेतली. ते जमावासोबत ग्रामीण रुग्णालय ते पोलीस स्टेशन असा सुमारे दीड किमीचा पायी प्रवास केला.
भाजप कार्यकर्ते फिरकले नाही
येथील विविध सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपाचा कब्जा आहे. भाजपाच्या एका नगरसेवकांचा अपघाती मृत्यू झाला असतांनाही जमावाच्या रोषाला बळी पडू नये,यासाठी अनेक भाजप कार्यकर्त्यानी दिवसभर घडलेल्या घडामोडीत सहभागी झाले नाही. त्यामुळे समाजबांधवात तीव्र रोष व्यक्त केला जात होता. पालकमंत्री राजकुमार बडोले जेव्हा ग्रामीण रुग्णालयात आले. त्यावेळी मात्र अनेक स्थानिक कार्यकर्ते त्यांचेसोबत होते.
निष्पक्ष कारवाई करावी- पटोले
भाजपचे नगरसेवक माणिक मसराम यांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे. या मृत्यू प्रकरणाचा पंचनामा होण्यापूर्वीच अपघातस्थळावरुन मृतदेहाची उचल पोलिसांनी केल्याचे समाजबांधव सांगत आहेत.त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. मी यासंदर्भात पोलीस अधीक्षकांशी बोललो. पोलिसांनी मृतकाला उचलून थेट रुग्णालयाच्या शवागारात टाकले ही बाब निश्चितच शंकास्पद आहे. उत्तरीय तपासणी ही कॅमेऱ्यासमोर झाली पाहिजे अशी मागणी आहे. यात पोलिसांवर राजकीय दबाव दिसून येतो मात्र याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करुन सर्व संशयीत आरोपीची चौकशी व्हावी व अटक करण्याची मागणी माजी खा. नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.