धोक्याची घंटा ! पाच वर्षात घटली सारसांची संख्या, गोंदिया जिल्ह्यात उरले केवळ २८ सारस

By अंकुश गुंडावार | Published: July 1, 2024 07:35 PM2024-07-01T19:35:33+5:302024-07-01T19:36:04+5:30

Gondia Wildlife News: महाराष्ट्रात सर्वाधिक सारस पक्षी गोंदिया जिल्ह्यात आहेत. मात्र प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या सारसांच्या संवर्धन करण्याकडे शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सारससुद्धा आता माळढोक पक्ष्याप्रमाणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

Alarm bell! The number of storks has decreased in five years, only 28 storks are left in Gondia district | धोक्याची घंटा ! पाच वर्षात घटली सारसांची संख्या, गोंदिया जिल्ह्यात उरले केवळ २८ सारस

धोक्याची घंटा ! पाच वर्षात घटली सारसांची संख्या, गोंदिया जिल्ह्यात उरले केवळ २८ सारस

गोंदिया - महाराष्ट्रात सर्वाधिक सारस पक्षी गोंदिया जिल्ह्यात आहेत. मात्र प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या सारसांच्या संवर्धन करण्याकडे शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सारससुद्धा आता माळढोक पक्ष्याप्रमाणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच झालेल्या सारस गणनेत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ सारस पक्षी कमी झाले आहे, तर गेल्या पाच वर्षांत सारस पक्ष्यांची संख्या ४५ वरून २८ वर आली आहे. त्यामुळे सारसांचा माळढोक होऊ द्यायचा नसेल तर सारस संवर्धनासाठी आत्ताच पाऊल उचलण्याची गरज आहे.

पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन यासाठी सातत्याने कार्यरत सेवा संस्था आणि वन व वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने २३ ते ३० जूनदरम्यान गोंदिया, बालाघाट, भंडारा तीन जिल्ह्यात सारस गणना करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात एकूण ७०-८० ठिकाणी सेवा संस्थेचे सदस्य, स्थानिक शेतकरी, सारस मित्र स्वयंसेवी आणि वनविभाग गोंदियाच्या कर्मचाऱ्यांनी सारस गणना यशस्वीरीत्या पूर्ण केली.

यासाठी ३९ चमू तयार करून सारस पक्ष्यांच्या विश्रांतीच्या जागेवर पहाटे ४.४५ वाजे ते सकाळी ९ वाजेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणावर थेट जाऊन गणना करण्यात आली. या सारस गणनेत जिल्ह्यात २८ सारस पक्ष्यांची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत सारस पक्ष्यांची संख्या घटली असून, ही सारसप्रेमींसाठी निराशाजनक बाब आहे, तर गोंदिया जिल्ह्याचे वैभव म्हणून ओळख असलेल्या सारस पक्ष्यांचीसुद्धा माळढोक होण्याच्या मार्गावर वाटचाल सुरू असल्याने निश्चितच ही धोक्याची घंटा आहे. विशेष सारस संवर्धनाकडे शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेत उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. मात्र यानंतरही यात फारशी सुधारणा झाली नसल्याचे चित्र आहे.

सारस गणनेत यांचा सहभाग
सारस गणनेत उपवनसंरक्षक प्रमोदकुमार पंचभाई, सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार, सहायक वनसंरक्षक योगेंद्रसिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक, रघुवेंद्र मून, सचिन धात्रक, सोनटक्के, गोवर्धन राठोड, सेवा संस्थेची चमू, शेतकरी आणि वनविभागाचे कर्मचारी यांचा सहभाग होता.

जिल्हानिहाय सारस पक्ष्यांची संख्या
गोंदिया जिल्हा- २८
बालाघाट जिल्हा- ४५
भंडारा जिल्हा ०४

गोंदिया जिल्ह्यातील गेल्या पाच वर्षांतील सारस पक्ष्यांची संख्या
वर्ष सारस

२०२०-४५
२०२१-३९
२०२२-३४
२०२३-३१
२०२४-२८

सारसांची घटती संख्या ही चिंतेची बाब
सन २०२४च्या सारस गणनेनुसार, विशेषत: गोंदिया जिल्ह्यात तसेच भंडारा जिल्ह्यातही सारस गणना करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात सारस पक्षी गोंदिया आणि जिल्ह्यालगतच्या सीमा भागात आढळतो. तत्कालीन सारस गणनेनुसार महाराष्ट्र राज्यात ३२ सारस पक्षी आढळले. ही चिंतेची बाब आहे. सारस संरक्षणासाठी शेतकरी आणि स्वयंसेवी संस्थासह प्रशासकीय पातळीवर विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. 

उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
सारस पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासन आणि गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. पण तिन्ही जिल्ह्यात उपाययोजना केवळ कागदावर राबविल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Alarm bell! The number of storks has decreased in five years, only 28 storks are left in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.