इतर मागासवर्गीयांच्या सर्व सवलतीचा लाभ इतरांना देऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:30 AM2021-05-11T04:30:26+5:302021-05-11T04:30:26+5:30
तिरोडा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इतर मागासवर्गीयांच्या सवलती मराठा समाजाला द्या, असे विधान नुकतेच केले आहे. असे ...
तिरोडा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इतर मागासवर्गीयांच्या सवलती मराठा समाजाला द्या, असे विधान नुकतेच केले आहे. असे केल्यास इतर मागासवर्गीयांवर अन्याय होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या सवलती मराठा समाजाला देऊ नये, अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा जनक्रांती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बन्सोड यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात राज्यात फडणविस यांचे सरकार असताना, मराठा आरक्षण विधानसभेत एक मताने सर्व पक्षीय मंजूर केले. या आरक्षणास कोणत्याही पक्षाने विरोध केला नाही. मात्र, या आरक्षणातील मुद्दे सर्वोच्च न्यायालयात योग्य स्वरूपात मांडण्यास सरकार अपयशी ठरले. आरक्षण निर्माण करताना फडणविस सरकारने सर्व बाजूने संविधानाचा आधार, केंद्र सरकारकडे चर्चा, राष्ट्रपतींची अनुमती या सर्व बाबींवर आरक्षण कायदा करताना विचार का केला नाही, त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील इतर मागासवर्गीयांच्या सर्व सवलती मराठ्यांना द्या, असे सांगत आहे. मात्र, यामुळे ओबीसीमधील घटकांचे नुकसान होणार नाही का, याचाही विचार करण्याची गरज आहे. ओबीसी आरक्षण भारतीय संविधानाच्या कलम ३४० नुसार आहे. त्यात दुर्लक्षित घटक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय यांचा समावेश आहे. त्यांची आर्थिक व शैक्षणिक प्रगती पूर्ण झालेली नाही. तेव्हा ओबीसी आरक्षणाचा पुरेपूर लाभ मराठा आरक्षणाला दिल्यास या घटकातील लोक वंचित होणार आणि त्यांचा आर्थिक व शैक्षणिक विकास होणार नाही. त्यामुळेच मराठा यांना इतर मागासवर्गीयांच्या सर्व सवलतीचा लाभ देऊ नये. असे केल्यास गोंदिया जिल्हा जनक्रांती विकास आघाडीतर्फे जन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी आ.दिलीप बन्सोड यांनी दिला आहे.