सर्वच बाबतीत विद्यमान सरकार अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:23 PM2019-01-29T23:23:59+5:302019-01-29T23:24:55+5:30
निवडणुकांपूर्वी केंद्र व राज्यातील विद्यमान भाजप सरकारने महागाई नियंत्रणात आणू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून हमीभाव देऊ, विदेशातील काळा पैसा परत आणू, रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावू आणि दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : निवडणुकांपूर्वी केंद्र व राज्यातील विद्यमान भाजप सरकारने महागाई नियंत्रणात आणू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून हमीभाव देऊ, विदेशातील काळा पैसा परत आणू, रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावू आणि दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र मागील साडेचार वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता सरकारने केली नाही. उलट देशात नेमके या विरोधात चित्र आहे. त्यामुळे विद्यमान सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याची टीका खा. प्रफुल्ल पटेल यांनी केली.
सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील डुंडा येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व आदिवासी मेळावा सोमवारी (दि.२८) आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा. मधुकर कुकडे, रमेश ताराम, मनोहर चंद्रिकापुरे, निता मेश्राम, गंगाधर परशुरामकर, रमेश चुºहे, अविनाश काशिवार, नरेश भेंडारकर, चंद्रकांत मरस्कोल्हे, इंजि. डी.यू.रहांगडाले, सुधाकर पंधरे, इंदू परशुरामकर, मंजू डोंगरवार, दिनेश कोरे, सचिन येसनसुरे, रुपविलास कुरसुंगे, एफ.आर.टी.शहा, सुनिता चिंधालोरे, बंटी भाटीया, सी.के. बिसेन, सेवकराम रहांगडाले, अनिता बाबोडे, डॉ.वाढई, उषा रहांगडाले, सुधा रहांगडाले, हटवार, क्रिष्णा सुरसाम, भरतलाल ठलाल, चंदन ठलाल व आदिवासीबांधव उपस्थित होते. खा.पटेल व कुकडे यांच्या हस्ते क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पटेल म्हणाले, सरकारने अलीकडे गावागावातील शाळा बंद करण्याचे धोरण सुरू केले आहे.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील चुलबंद, गोसेखुर्द, भिमलकसा, बावणथडी या धरणाची निर्मिती आमच्या सरकारच्या कार्याकाळात करण्यात आली.
विद्यमान सरकारने मागील साडेचार वर्षाच्या कार्यकाळात एकही मोठा सिंचन प्रकल्प मार्गी लावला नाही. उलट भेलसारखा मोठा उद्योग बंद पाडण्याचे काम केले. केंद्र व राज्यात आमचे सरकार सत्तेवर आल्यास धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीेभाव देण्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. गोंदिया-भंडारा जिल्हाचा सर्वांगिन विकास हेच आपले ध्येय आहे.
आदिवासी समाजाच्या विकासात क्रांतीसूर्य विर बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. पुतळा उभारण्यासाठी डुंडा येथील आदिवासीबांधवानी मनोहर चंद्रिकापूरे व निता मेश्राम आभार मानले. डुंडा येथील विठ्ठल रुखमाई मंदिराला तीन लाख रुपये देण्याचे आश्वासन पटेल यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन अनिरुद्ध बांबोडे यांनी केले तर आभार अविनाश काशिवार यांनी मानले.