उपजिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा झाल्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:30 AM2021-05-21T04:30:30+5:302021-05-21T04:30:30+5:30
तिरोडा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी विभागासह इतर सोयी-सुविधा मागील दीड महिन्यापासून बंद होत्या. त्यामुळे रुग्णांची गैरसोय ...
तिरोडा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी विभागासह इतर सोयी-सुविधा मागील दीड महिन्यापासून बंद होत्या. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. रुग्णालयातील सर्व सोयी-सुविधा पूर्ववत सुरू करण्याचे आ. विजय रहांगडाले यांनी गुरुवारी रुग्णालयात आयोजित आढावा बैठकीत वैद्यकीय अधीक्षक डाॅ. हिम्मत मेश्राम यांना दिले.
येथील उपजिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्ण तपासणी विभाग सुरू करण्यात आला, तर रुग्ण सुविधेच्या इतर सर्व वैद्यकीय सेवा आठ दिवसांनी सुरू होतील असे सांगण्यात आले होते; पण कोविड केंद्रात रुग्ण अत्यल्प असल्यामुळे या सेवा-सुविधा लवकरात लवकर सुरू व्हावे अपेक्षित होते. त्यामुळे पत्रकार संघाने आमदार विजय रहांगडाले यांच्यासह गुरुवारी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. ओपीडी, गरोदर महिलांची तपासणी, प्रसूती, सीजर, रुग्णवाहिका, आदी सर्व सेवा-सुविधा आजपासून सुरू राहतील, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांनी सांगितले. आ. विजय रहांगडाले यांच्या आमदार निधीतून २५ लाख रुपयांची ऑक्सिजन सुविधायुक्त अद्ययावत रुग्णवाहिका तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यात आली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पणसुद्धा यावेळी न्यायाधीश अशोक धामेचा व पत्रकार लक्ष्मीनारायण दुबे यांच्या हस्ते झाले. उपजिल्हा रुग्णालयात एकूण तीन रुग्णवाहिका झाल्या आहेत. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. कंचन रहांगडाले, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. चंद्रकिशोर पारधी, ईश्वर हणवते, उमाकांत हरोडे, नगरसेवक राजेश गुणेरिया, तालुका पत्रकार संघाचे मुकेश अग्रवाल, लक्ष्मीनारायण दुबे, विजय खोब्रागडे, नितीन आगाशे, पंकज देहलीवाल, देवानंद शहारे, आदी पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.