सव्वा चार कोटींची औषधांची देयके थकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:00 AM2020-01-24T06:00:00+5:302020-01-24T06:00:17+5:30
केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचे हस्तांरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे करण्यात आले. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयाला सार्वजनिक आरोग्य विभागाकडून औषधी खरेदीसाठी मिळणारा निधी मिळणे बंद झाले. त्यामुळे रुग्णांना औषध पुरवठा करण्याची जवाबदारी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयावर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला औषधांचा पुरवठा करणाऱ्या औषध विक्रेत्यांचे सव्वाचार कोटी रुपयांचे देयके मागील तीन वर्षांपासून थकले आहेत. शासनाकडून यासाठी अद्यापही निधी न मिळल्याने औषध विक्रेते त्रस्त झाले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचे हस्तांरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे करण्यात आले. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयाला सार्वजनिक आरोग्य विभागाकडून औषधी खरेदीसाठी मिळणारा निधी मिळणे बंद झाले. त्यामुळे रुग्णांना औषध पुरवठा करण्याची जवाबदारी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयावर आली. यासाठी महाविद्यालयाने २०१६ ते २०१८ या कालावधीत रुग्णांना औषध देण्यासाठी स्थानिक स्तरावर खरेदी केली.
या दरम्यान जवळपास ४ कोटी २४ लाख रुपयांची औषध खरेदी करण्यात आली. यानंतर शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना औषधांचा पुरवठा करण्यासाठी हॉपकिन्स कंपनीशी करार केला. याच कंपनीकडूनच औषधांचा पुरवठा सुरू झाला. मात्र यापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने स्थानिक स्तरावर खरेदी केलेल्या ४ कोटी २४ लाख रुपयांची देयके मागील तीन वर्षांपासून शासनाने अदा केली नाही. यासाठी महाविद्यालयाने शासनाकडे वांरवार पाठपुरावा केला. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. कोट्यवधी रुपयांच्या देयकांसाठी औषध विक्रेते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायºया झिजवित आहे. त्यातच बरेचदा हॉपकिन्स कंपनीकडून औषधांचा पुरवठा होण्यास विलंब होतो. अशावेळी महाविद्यालयाला स्थानिक स्तरावरुन औषधी खरेदी करावी लागते. मात्र औषध विक्रेत्यांचे आधीचेच ४ कोटी २४ लाख रुपयांचे देयके थकले आहेत. त्यामुळे हे औषध विक्रेते पुन्हा उधारीवर औषधी देण्यास नकार देत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुध्दा चांगलीच अडचण झाली आहे. दरम्यान बरेचदा गोरगरीब रुग्णांना बाहेरुन औषधी आणून आपली गरज भागवावी लागत आहे.
शासनाकडून निधी न मिळाल्याचा फटका गोरगरीब रुग्णांना बसत आहे.
हॉपकिन्सचे देयक थकले
शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना औषधांचा पुरवठा करण्यासाठी हॉपकिन्स कंपनीशी करार केला आहे. या कंपनीकडून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ४ कोटी ५० लाख रुपयांची औषधी खरेदी केली आहे. मात्र यापैकी शासनाने आतापर्यंत केवळ दीड कोटी रुपयांचा निधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिला आहे.
प्रभारी अधिष्ठातावर कारभार किती दिवस
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला मात्र अद्यापही येथे स्थायी अधिष्ठाताची नियुक्ती करण्यात आली नाही. परिणामी येथील कारभार प्रभारी अधिष्ठाताच्या भरोश्यावर सुरू आहे. यामुळे निर्णय घेतांना सुध्दा अडचण जात आहे. येथे स्थायी अधिष्ठाताची नियुक्ती केव्हा करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सन २०१६ ते २०१८ दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने खरेदी केलेल्या औषधीचे ४ कोटी २४ लाख रुपयांची देयके शासनाकडून अद्यापही मिळाली नाही. यासंदर्भात शासनाकडे सातत्याने पत्र व्यवहार करण्यात आला. तर हॉपकिन्स कंपनीचे सुध्दा दीड कोटी रुपयांचे बिल थकले आहे.
- डॉ.व्ही.पी.रुखमोडे,
प्रभारी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.