निकालानंतर सर्वच पक्षांचे दावे प्रतिदावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 09:55 PM2017-10-20T21:55:25+5:302017-10-20T21:56:30+5:30
जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी (दि.१७) रोजी जाहीर झाले. यानंतर भाजप, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस या सर्वच पक्षांनी आपल्या पक्षाचे समर्थन असलेले सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याचा दावा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी (दि.१७) रोजी जाहीर झाले. यानंतर भाजप, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस या सर्वच पक्षांनी आपल्या पक्षाचे समर्थन असलेले सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याचा दावा केला. यावरुन काही पक्षांच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला. सर्वच पक्षांनी दावे प्रतिदावे केल्याने मतदार मात्र अद्यापही संभ्रमात असल्याचे चित्र आहे.
निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र यापैकी ३ ग्रामपंचायतीची निवडणूक आक्षेप घेतल्याने रद्द झाली. तर तीन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यामुळे उर्वरित ३४१ ग्रामपंचायतीसाठी १६ आॅक्टोबरला निवडणूक घेण्यात आली. ३४७ सरपंचपदासाठी एकूण १०५७ तर २९७४ सदस्यपदासाठी ८ हजार सदस्य निवडणूक रिंगणात होते. मंगळवारी निकालानंतर आमगाव, सडक-अर्जुनी, तिरोडा तालुक्यात राष्टÑवादी काँग्रेसचे सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा त्या पक्षाच्या नेत्यांनी केला. तर देवरी तालुक्यात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्या पक्षाचे समर्थन असलेले सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा केला. तर हीच स्थिती गोंदिया, गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात कायम होती. येथे सुध्दा सर्वच राजकीय पक्षांनी समर्थन असलेले सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा केला.
यावरुन काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये वाद देखील झाले. काही पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक निकालानंतर लगेच प्रसिध्दी पत्रक काढून आपल्या पक्षाचे समर्थन असलेले सर्वाधिक सरपंच कसे निवडून आले, याची यादीच पाठविली. तर काहींनी आकड्यांचे गणित सुध्दा जुळवून पाठविली. सर्वच पक्षांनी वर्तमानपत्राच्या कार्यालयांना सर्वाधिक जागा निवडून आल्याचे प्रसिध्दपत्रक पाठवून आपल्या पक्षाचे सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा केला. त्यामुळे नेमके कुठल्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले हे कळायला मतदारांना मार्ग नाही.
सरपंच, सदस्यांची मनधरणी
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर आपले पक्षाचे वर्चस्व असावे, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडून आलेले सरपंच आणि सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे चित्र आहे. यासाठी त्या त्या गावातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या पक्षात आणण्याचे प्रयत्न केले जात आहे.
अपक्ष सदस्यांकडे लक्ष
ग्रामपंचायतीत निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले अपक्ष सरपंच आणि सदस्य हे आता कुठली भूमिका घेतात. अपक्ष म्हणून राहतात की कुठल्या पक्षात प्रवेश करतात याकडे गावकºयांचे लक्ष लागले आहे.
थेट निवडीने उत्सुकता संपली
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यात आली. शिवाय निवडून आलेल्या सरपंचावर अडीच वर्षे अविश्वास आणता येणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये कोणत्या पक्षाची सत्ता स्थापन होणार, सरपंचपदी कोण आरुढ होणार याबाबत पूर्वी असलेली उत्सुकता थेट सरपंच निवडीने आता संपुष्टात आली.
सरपंचांना छाप सोडण्याची संधी
सरपंचपदी निवडून आलेल्यांना ग्रामपंचायतचा कारभार साभाळतांना आता कुठलीही अडचण नाही. त्यामुळे सरपंचांने गाव विकासाची रुपरेषा आखून कामे केल्यास मतदारांवर छाप सोडण्याची संधी मिळणार आहे. शिवाय गावाचा सर्वांगिन विकास करुन गावकºयांसमोर आदर्श ठेवता येणार आहे.