आजपासून जिल्ह्यातील सर्वच दुकाने राहणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 05:00 AM2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:00:19+5:30
जिल्हा ग्रीन झोनमध्ये येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व खासगी कार्यालये, केश कर्तनालये, सलून, ब्युटी पार्लर, टॅक्सी, कॅब, ऑटो, रिक्षा व सायकल रिक्षांना तसेच उपहारगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट व ज्यूस सेंटर यांना अटी व शर्तीवर आणि वेळेचे बंधन घालून सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील ३० दिवसात एकही कोरोना बाधीत रुग्ण न आढळल्याने जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुरूवातीला आठवड्यातून तीन दिवस दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. आता पुन्हा सोमवारपासून (दि.११) जिल्हाधिकाऱ्यांनी यात पुन्हा वाढ करीत सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालवधीत शहर व ग्रामीण भागातील सर्व दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तर टॅक्सी, ऑटो, कॅब यांना सुध्दा ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी शनिवारी (दि.९) लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
जिल्हा ग्रीन झोनमध्ये येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व खासगी कार्यालये, केश कर्तनालये, सलून, ब्युटी पार्लर, टॅक्सी, कॅब, ऑटो, रिक्षा व सायकल रिक्षांना तसेच उपहारगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट व ज्यूस सेंटर यांना अटी व शर्तीवर आणि वेळेचे बंधन घालून सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
यासाठी फिजिकल डिस्टन्स,सर्व कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर करणे, हॅन्ड वॉश स्टेशन व सॅनिटायझर उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व केश कर्तनालये, सलून व ब्युटी पार्लर सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजता दरम्यानच्या कालावधीत सुरू असतील.
फिजीकल डिस्टन्स, वापरात येणारे सर्व साहित्य व इतर बाबी प्रत्येक वापरानंतर निर्जंतुक करणे आवश्यक आहे. दुकानाच्या आत गर्दी होणार नाही याची जबाबदारी दुकानदाराची असेल.
गर्दी रोखण्यासाठी बाहेर खुणा करणे व टोकन पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे. दोन खुर्च्यांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे, केश कर्तनालयात एका ग्राहकास वापरण्यात आलेले कापड, टॉवेल व रु माल इत्यादीचा पुन्हा वापर करू नये असे निर्देश दिले आहे.
ग्राहकांनी स्वत:च आणावे टॉवेल
केश कर्तनालय, सलूनमध्ये जातांना ग्राहकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वत:च घरुन टॉवेल, कापड व रुमाल सोबत आणावे. अशा सूचना सुध्दा जिल्हा प्रशासनाने केल्या आहे. केश कर्तनालयात येणाऱ्या ग्राहकाचे नाव, संपर्क क्र मांक व पत्ता नोंदविण्यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. ती अद्यावत ठेवण्याची जबाबदारी ही संबंधित आस्थापनाधारकाची असणार आहे.
केवळ पार्सल सुविधेची मुभा
उपाहारगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट व ज्यूस सेंटर या आस्थापनामधून पार्सल सुविधा, घरपोच सुविधा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु बैठक व्यवस्थेच्या माध्यमातून खाद्यपदार्थ सेवनास या आस्थापनामध्ये बंदी करण्यात आली आहे. ग्राहक खाद्यपदार्थ खरेदी करू शकेल व घरपोच सुविधा असेल पण त्या आस्थापनांमध्ये खाद्यपदार्थ खाण्यास मनाई करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. आस्थापनातील सर्व कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी हात धुणे आवश्यक आहे. सर्वांनी तेथे मास्कचा वापर करणे तसेच स्थापनेच्या बाहेर हॅन्ड वॉश स्टेशन व सॅनिटायझर उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. ई-कॉमर्स व कुरियरद्वारे वस्तूंची घरपोच सुविधा सुरू राहील.
ई-पेमेंटवर द्या भर
वरील सर्व आस्थापनांमध्ये शक्यतो ई-पेमेंट व्यवहार करण्यास प्राधान्य द्यावे. कमीत कमी रोखीने व्यवहार करावे. आस्थापना व वाहतुकीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची सर्व आस्थापना चालकांनी दक्षता घ्यावी. सर्व खाजगी कार्यालय प्रमुख, कर्मचारी, आस्थापनाधारक व वाहन चालक यांनी आरोग्य सेतू अॅप्स डाऊनलोड करावा.
टॅक्सीला दोन तर रिक्षामध्ये एक प्रवासी नेण्याची परवानगी
जिल्ह्यातंर्गत आॅटोरिक्षा, सायकलरिक्षा यांना तसेच दुचाकी वाहनावर फक्त चालकास प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. टॅक्सी कॅबमध्ये एक चालक व दोन प्रवासी आणि आॅटो रिक्षा व सायकल रिक्षामध्ये एक चालक व एक प्रवासी यांना शारीरिक अंतर पाळून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे.