‘त्या’ मजुराच्या मृत्यू प्रकरणात सर्वच गप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:26 AM2021-01-22T04:26:46+5:302021-01-22T04:26:46+5:30
अर्जुनी - मोरगाव : येथील पंचायत समितीच्या नवनिर्मित इमारतीच्या बांधकामासाठी जुनी इमारत तोडण्याचे काम सुरू आहे. याच कामावर सोमवारी ...
अर्जुनी - मोरगाव : येथील पंचायत समितीच्या नवनिर्मित इमारतीच्या बांधकामासाठी जुनी इमारत तोडण्याचे काम सुरू आहे. याच कामावर सोमवारी (दि. १८) देवराम बावने (६२, रा. खैरी-सुकडी) यांचा इमारतीवरून खाली पडून मृत्यू झाला होता. मात्र या प्रकरणात अद्याप पोलिसांत नोंद करण्यात आलेली नाही. या कामावरील कामगारांच्या सुरक्षेची काळजी योग्य प्रकारे न घेतल्याने कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मागील आठवड्यापासून जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कंत्राटदारामार्फत पंचायत समितीच्या नवनिर्मित इमारतीसाठी जुनी इमारत तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामावर असलेले मजूर कवेलू व फाटे काढण्याचे काम करीत होते. दरम्यान, वयोवृद्ध मजूर देवराम बावने हे सोमवारी (दि. १८) काम करीत असताना खाली पडल्याने त्यांना जबर मार लागला. त्यामुळे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना लाखनीजवळ रस्त्यातच मंगळवारी (दि. १९ ) दुपारी २.३० वाजतादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्या मजुराच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले, मात्र याबाबत शेजारीच असलेल्या पोलीस ठाण्यात अद्यापही गुन्ह्याची नोंद नसल्याचे समोर आले आहे. कंत्राटदाराने या प्रकरणात पोलिसांना अद्यापही माहिती दिली नसून जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनसुद्धा गप्प बसल्याने त्या मृत मजुराच्या कुटुंबीयांवर मात्र संकट ओढवले आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यात याची कुठलीही माहिती नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल होणार का? अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.