शासकीय रुग्णालयांतील सर्व शस्त्रक्रिया सुरू; थांबलेले उपचार पुन्हा सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:42+5:302021-07-11T04:20:42+5:30

गोंदिया : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून इतर आजारांच्या शस्त्रक्रियांकडे दुर्लक्ष झाले होते. गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, ...

All surgeries performed in government hospitals; Stopped treatment resumes! | शासकीय रुग्णालयांतील सर्व शस्त्रक्रिया सुरू; थांबलेले उपचार पुन्हा सुरू!

शासकीय रुग्णालयांतील सर्व शस्त्रक्रिया सुरू; थांबलेले उपचार पुन्हा सुरू!

googlenewsNext

गोंदिया : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून इतर आजारांच्या शस्त्रक्रियांकडे दुर्लक्ष झाले होते. गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यात येत होत्या. परंतु, इतर शस्त्रक्रियांकडे लक्ष दिले जात नव्हते. त्यांना तारीख पे तारीख दिली जात होती. परंतु, आता गोंदिया जिल्ह्यात कोराेनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे इतर आजारांसाठी ही आरोग्य सेवा पूर्वपदावर आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत हजारो रुग्णांनी उपचार घेतला आहे. इतर प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास वेग आला आहे. कोरोनाच्या काळात दररोज ओपीडी ही २०० होती. परंतु, आजघडीला नेहमीप्रमाणे रुग्णसंख्या वाढत असून, ओपीडीची संख्या पाहता ५०० च्या घरात रुग्ण उपचारासाठी येत आहेत. कोरोना काळात रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, शस्त्रक्रियांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्या शस्त्रक्रिया आता पूर्वपदावर आल्या आहेत.

...........................

कोणत्या रुग्णालयात कोणत्या शस्त्रक्रिया

-जिल्हा सामान्य रुग्णालय : सर्व प्रकारच्या आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात येतात. परंतु, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासत आहे.

-मेडिकल कॉलेज गोंदिया येथे गंभीर आजारावर शस्त्रक्रिया करण्यात येतात. काही शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. आता सर्वच शस्त्रक्रिया होत आहेत.

-बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय : गर्भवती महिलांची प्रसूती करण्यासाठी शस्त्रक्रिया, गर्भाशय काढणे, पोटातील गोळा काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात येतात.

.........................

ओपीडीत होऊ लागली गर्दी

केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय यांचा आढावा घेतला असता या तिन्ही रुग्णालयांत दररोज ५०० च्या घरात रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. छोट्या आजारापासून ते मोठे आजार असणारे रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयाकडे धाव घेत आहेत.

.................................

वर्षभरापासूनची प्रतीक्षा संपली

१) अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. शस्त्रक्रिया करण्याचा आता मुहूर्त निघाला. अनेक दिवसांपासून पोटाची शस्त्रक्रिया करायची होती. परंतु, कोरोनामुळे रुग्णालयात दाखल केले जात नव्हते. त्यामुळे माझी शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. डॉक्टरांनी आता तारीख दिली. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी मी रुग्णालयात दाखल झालो आहे.

घनश्याम कोरे, रुग्ण

..................

२) गर्भाशय काढायचे असल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले आहे. कोरोनाच्या वेळेस अनेकदा रुग्णालयात आल्यावरही डॉक्टरांनी परत पाठविले होते. परंतु, कोरोनाचा प्रभाव कमी होताच डॉक्टरांनी सांगितल्यानुसार रुग्णालयात दाखल झाले आहे.

- चंद्रकला पाथोडे, रुग्ण

................

गोरगरिबांवर कोरोना काळात उपचार झालेच नाही

गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात, जिल्हा सामान्य रुग्णालयात किंवा बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात कोरोनाच्या काळात फक्त कोरोनाच्याच रुग्णांवर उपचार करण्यात आली व गर्भवतीची प्रसूती करण्यात आली. याशिवाय इतर कुठल्याही आजारावर उपचार करण्यात आले नाही. त्यामुळे गोरगरिबांनाही खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजवावे लागले. त्यात खासगी रुग्णालय चालकांकडून गोरगरिबांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करण्यात आली.

...............................

काेट

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आता सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात होत आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी अजूनही कोरोना संपलेला नाही. त्यासाठी कोरोनासंदर्भात घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करून रुग्णांनी उपचार घ्यावा.

- डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक, गोंदिया.

Web Title: All surgeries performed in government hospitals; Stopped treatment resumes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.