नियोजन समितीच्या सभेत सदस्याला बोलू न दिल्याचा आरोप
By अंकुश गुंडावार | Published: August 14, 2024 06:51 PM2024-08-14T18:51:15+5:302024-08-14T18:52:11+5:30
सदस्याने केला सभात्याग : पालकमंत्र्यांवर व्यक्त केली नाराजी
गोंदिया : जिल्हा नियोजन समितीची सभा बुधवारी (दि.१४) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी समितीचे विशेष निमंत्रित सदस्य माजी आ. गोपालदास अग्रवाल यांना बोलण्यास मनाई केल्याने सभेचे वातावरण काही काळाकरिता तणावपूर्ण झाले होते. नियोजन समितीचे अध्यक्ष असलेल्या पालकमंत्र्यांच्या या भूमिकेचा निषेध नोंदवित गोपालदास अग्रवाल यांनी सभात्याग केला.
विशेष म्हणजे नियोजन समितीच्या सभेला खा. प्रफुल्ल पटेल, आ. विनोद अग्रवाल, परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, आ. सहेषराम कोरेटी, आ. मनोहर चंद्रिकापुरे उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सदस्याला प्रश्न उपस्थित करण्यापासून रोखण्याची गोंदिया जिल्ह्यातील इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलल्या जाते. माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी आपले काही प्रश्न उपस्थित करून प्रश्नाचे समाधान करण्याची विनंती केली. मात्र, पालकमंत्री आत्राम यांनी त्याचे समाधान करण्याऐवजी त्यांना बोलण्यास मनाई केली. त्यामुळे संतप्त माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी पालकमंत्रीच सदस्यांचे प्रश्न थांबवत असतील तर समस्यांचे समाधान कसे होणार, असे म्हणत सभात्याग करीत बाहेर निघाले.
नियोजन समिती सभेचा एक नियम असतो. प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येक सदस्याला आहे, पण ते सभेच्या नियमानुसार असायला हवे. नियमाविरुद्ध असेल तर ते खपवून घेतले जात नाही. माजी आ. अग्रवाल यांची प्रश्न विचारण्याची पद्धत चुकीची असल्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्यास मनाई केली. यानंतर ते या सभेतून निघून गेले.
- धर्मरावबाबा आत्राम, पालकमंत्री, गोंदिया
गोपालदास अग्रवाल यांंनी दिला सदस्य पदाचा राजीनामा
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बुधवारी (दि.१४) पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी या समितीचे विशेष निमंत्रित सदस्य गोपालदास अग्रवाल यांना सभेत बाेलू दिले नाही. याचा निषेध नोंदवित गोपालदास अग्रवाल यांनी सभात्याग केला. त्यानंतर नियोजन समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविल्याचे त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. आठ महिन्यापुर्वी त्यांची राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरुन जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून निवड करण्यात आली हे विशेष. नियाेजन समितीच्या सभेत सदस्याला बोलण्यापासून रोखणे हे लोकशाही विरोधी आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यापासून रोखणाऱ्या पध्दतीचा मी निषेध नोंदवित सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.