२.६० कोटींचा बोनस ६२.४० टक्क्यांनी होणार वाटप
By admin | Published: January 5, 2017 12:51 AM2017-01-05T00:51:40+5:302017-01-05T00:51:40+5:30
तेंदू हंगामाची प्रोत्साहनार्थ मजुरी (बोनस) पाच कोटी ७६ लाख रूपये वन विभागाला वाटप करावयाचे होते.
तेंदूपाने संकलनकर्त्यांना लाभ : ३४.२८ टक्क्यांनी ३.१६ कोटींचे वाटप
गोंदिया : तेंदू हंगामाची प्रोत्साहनार्थ मजुरी (बोनस) पाच कोटी ७६ लाख रूपये वन विभागाला वाटप करावयाचे होते. यापैकी ३.१६ कोटी रूपये ३४.२८ टक्केवारीनुसार मजुरांना वाटप करण्यात आले. तर आता नवीन आदेशाने उर्वरित २.६० कोटी रूपये ६२.४० टक्क्यांनी सरसकट मजुरांच्या खात्यात घालण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सन २०१४ तेंदू हंगामाच्या बोनस वाटप अहवालानुसार, एकूण ४८ हजार ०४२ मजुरांना चार कोटी २८ लाख ३५ हजार ०७९ रूपयांची प्रोत्साहनार्थ मजुरी वाटप करावयाची होती. त्यातही ५०० रूपयांच्या आतील रोखीने तर ५०० रूपयांच्या वरील रक्कम धनादेशाने द्यायचे होते. त्यानुसार ५०० रूपयांच्या आतील २१ हजार ०३३ मजुरांना ५२ लाख ८० हजार ६७८ रूपये रोखीने व २७ हजार ०१९ मजुरांना तीन कोटी ७५ लाख ५४ हजार ४०१ रूपये धनादेशाद्वारे वाटप करावयाचे होते. यापैकी २० हजार ९९७ मजुरांना रोखीने ५२ लाख ७४ हजार ७३७ रूपये व धनादेशाद्वारे २६ हजार ६२५ मजुरांना तीन कोटी ६७ लाख ३५ हजार ३११ रूपये वाटप करण्यात आले. अशा एकूण ४७ हजार ६२२ मजुरांना चार कोटी २० लाख १० हजार ०४८ रूपये वाटप करण्यात आले. तरी २७ नोव्हेंबर २०१६ पर्यंत आठ लाख २५ हजार ०३१ रूपयांचे बोनस वाटप करणे बाकी आहे.सन २०१५ तेंदू हंगामात ४२ हजार ४४३ मजुरांना तीन कोटी १६ लाख ३७ हजार ६६८ रूपये वाटप करावयाचे होते. यात ५०० रूपयांच्या आतील व वरील सर्वच प्रकारच्या मजुरांना धनादेशाद्वारे किंवा सरळ मजुरांच्या बँक खात्यात जमा करावयाचे असल्याने रोखीने व्यवहार करण्यात आलेला नाही. यापैकी एकूण ३२ हजार १०१ मजुरांना धनादेशाद्वारे दोन कोटी ८५ लाख ५७ हजार ८७७ रूपये धनादेशाद्वारे वाटप करण्यात आले. काही मजुरांचे, कुटुंबप्रमुखांचे खाते उपलब्ध नसल्यामुळे ही रक्कम शिल्लक आहे, मात्र येत्या ३१ मार्चपर्यंत ही रक्कम वाटप करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)
ंआता रोखीने व्यवहार न करण्याचे आदेश
प्रोत्साहनार्थ मजुरी वाटपाच्या मान्य प्रस्तावात सन २०१५ मधील तेंदू हंगामातील प्रोत्साहनार्थ मजुरी वाटपाची टक्केवारी ६४.४० निश्चित करण्यात आले आहे. तेंदूपाणे संकलनकर्त्यांना बोनस वाटपाची कार्यवाही शासन निर्णयात नमूद तरतुदी व कार्यालयाकडून जाहीर केलेल्या निर्देशांच्या अधिन राहून तात्काळ करण्याच्या सूचना आहेत. सन २०१५ च्या हंगामातील संकलनकर्त्यांना बोनस वाटपाची प्रगती दर मंगळवारी फॅक्स किंवा ई-मेलद्वारे सादर करण्याचीही सूचना आहे. तसेच सन २०१४ तेंदू हंगामातील तेंदूपाणे संकलनकर्त्या कुटुंबप्रमुखास ५०० रूपयांच्या आत वाटप करणारी प्रोत्साहन मजुरीची रक्कमदेखील रोखीने न वाटता संबंधितांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश आहेत.