भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:26 AM2021-03-22T04:26:13+5:302021-03-22T04:26:13+5:30
कटंगी प्रकल्पासाठी सन २०१२ पासून जमीन संपादित करण्यात आली; मात्र प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला मागील नऊ वर्षांपासून मिळालेला नव्हता. ...
कटंगी प्रकल्पासाठी सन २०१२ पासून जमीन संपादित करण्यात आली; मात्र प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला मागील नऊ वर्षांपासून मिळालेला नव्हता. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी रविकांत बोपचे यांना याबाबत निवेदन दिले होते. यामध्ये शेतकऱ्यांनी, उपविभागीय कार्यालय (तिरोडा) येथे मागील ५-१० वर्षांपासून पाठपुराव्यानंतरही मोबदल्यासंबंधी सकारात्मक प्रयत्न करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना आतापर्यंत मोबदल्याकरिता ताटकळत राहावे लागत असल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती बोपचे यांना मिळताच त्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांना याबाबत माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत खासदार पटेल व माजी आमदार जैन यांनी बोपचे यांच्या निवेदनावर संबंधित उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी व पटवारी यांना प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश दिले. त्यानंतर संबंधित विभागाद्वारे नियमानुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला आहे. याबद्दल शेतकरी चंदुलाल जोशी, नंदू जोशी, अनुसया सोनेवाने, बाबूलाल नाईक, दुर्गा बारेवार, उमाकांत चन्ने, शिशूला राऊत, भोजराज कटरे, कुशमन कटरे, साहेब चौधरी यांनी खासदार पटेल, माजी आमदार जैन व बोपचे यांचे आभार मानले.