मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:43 AM2018-01-13T00:43:05+5:302018-01-13T00:43:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा मागासवर्गीय मेरिट विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करण्यास परवानगी देण्यात यावी, या मागणीचे निवेदन ओबीसी संघर्ष कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
निवेदनानुसार, खुल्या प्रवर्गातून मागासवर्गीयांना (एससी, एसटी, ओबीसी, एसबीसी, एनटी) अर्ज भरण्यास प्रवेश नाकारणे म्हणजे १५ टक्के लोकांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवणे होय. आधीच सरकारच्या नाकर्तेपणामुळे न्यायालयाने आरक्षण (राखीव जागा) ५० टक्के मर्यादित केलेल्या आहेत. यात शोषित-पीडित-बहुजन ८५ टक्के मागासवर्गीय समाजाला बंदिस्त करून उर्वरित ५० टके जागा उच्चवर्णीयांसाठी राखीव करण्यात आले असून, हे १५ टक्के समाजासाठी केलेली अप्रत्यक्ष आरक्षणाची तरतूद होय. खुल्या प्रवर्गातून मेरिटला नाकारणे म्हणजेच मागासवर्गीय मेरिट विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
असा अन्याय ओबीसी संघर्ष कृती समिती व समविचारी संघटन खपवून घेणार नाही. जर शासनाने अशा प्रकारचा मनुवादी छुपा अजेंडा राबविला तर याचे तीव्र पडसाद भोगावे लागतील व निर्माण होणाºया परिस्थितीला शासन-प्रशासन जबाबदार असेल. त्यामुळे वेळीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाºया परीक्षांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आधीप्रमाणे अर्ज करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी संघटनेचे खेमेंद्र कटरे, कैलाश भेलावे, नागेश ठाकूर, प्रेमलाल गायधने, तिर्थराज उके, सावन डोये, चंदू बहेकार, शरद मेश्राम, राजकुमार खोब्रागडे आदी उपस्थित होते.