सिमेंट ओट्यावर धान खरेदी करण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:20 AM2021-06-20T04:20:28+5:302021-06-20T04:20:28+5:30
शेंडा (कोयलारी) : आदिवासी विकास महामंडळाने विविध कार्यकारी सहकारी संस्था डोंगरगाव (सडक) अंतर्गत येणाऱ्या कोयलारी एकाधिकार धान खरेदी केंद्र ...
शेंडा (कोयलारी) : आदिवासी विकास महामंडळाने विविध कार्यकारी सहकारी संस्था डोंगरगाव (सडक) अंतर्गत येणाऱ्या कोयलारी एकाधिकार धान खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी फार उशिरा दिली. धान खरेदी करण्याची मुदत ३० जूनपर्यंत ठरवून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन केलेल्या सातबारावरून या संस्थेकडे रब्बी धान खरेदी करण्याचे उद्दिष्ट २५ हजार क्विंटल आहे. मात्र जागेअभावी आतापर्यंत केवळ ५ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. उरलेले २० हजार क्विंटल धान शेतकऱ्यांच्या घरीच पडून आहे.
कोयलारी संस्थेने धान खरेदीसाठी सात लक्ष रुपये खर्च करून याचवर्षी सिमेंटचे ओटे तयार केले आहे. धानाच्या बचावासाठी संस्थेकडे भक्कम ताडपत्र्यासुद्धा उपलब्ध आहेत. याच ओट्यावर संस्थेने धान खरेदी केल्यास धान खरेदीची समस्या नक्कीच दूर होईल. तरी शासनाने सिमेंट ओट्यावर धान खरेदीची परवानगी द्यावी, अशी मागणी सर्व शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या मृग नक्षत्र सुरू असून खरीप हंगामाच्या मशागतीसाठी पैशांची नितांत गरज आहे. धान विक्री करून खते, बी-बियाणे व दुसऱ्याचे देणे यासाठी शेतकरी धडपड करत आहे. परंतु धान खरेदीसाठी जागाच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून संस्थेने धान घेणे बंद केले. त्यातल्या त्यात कोयलारी संस्थेला २५ हजार क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहेत. परंतु आतापर्यंत शासकीय आश्रमशाळेच्या गोडाऊनमध्ये ५ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यामुळे उरलेला २० हजार क्विंटल धान शेतकऱ्यांच्या घरीच पडून आहे. धान खराब होऊ नये म्हणून संस्थेने सात लक्ष रुपये खर्चून सिमेंटचे ओटे तयार केले. संस्थेकडे भरपूर ताडपत्र्यासुद्धा उपलब्ध आहेत. तरीही अधिकारी त्या ओट्यांवर धान खरेदीची परवानगी का देत नाही, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
.........
जिल्हा प्रशासनाने घ्यावी दखल
जिल्हाधिकाऱ्यांनी रब्बी हंगामातील धान आश्रमशाळा व इतर शासकीय सभागृहात खरेदी करण्याचे आदेश दिले असले तरी खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होऊच शकत नाही. यासासाठी संस्थेचे ओटेच एकमात्र उपाय आहे, असे शेतकरी बोलतात. खरेदी बंद पडल्याने शेतकऱ्यांमध्ये आक्रोश वाढत आहे. शासनाने सिमेंट ओट्यावर धान खरेदीची त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.