भाजीसोबतच आता वरणही ताटातून आऊट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:18 AM2021-07-23T04:18:32+5:302021-07-23T04:18:32+5:30
गोंदिया : भाजीपाल्याचे भाव कडाडल्याने काय खावे, असा प्रश्न पडत असून ताटातून भाजी गायब झाली असून त्याच्या जागी ...
गोंदिया : भाजीपाल्याचे भाव कडाडल्याने काय खावे, असा प्रश्न पडत असून ताटातून भाजी गायब झाली असून त्याच्या जागी फोडणीचे वरण खाऊन चालवून घेऊ, असे गणित सर्वसामान्यांनाकडून जुळविले जात होते. मात्र डाळींचे दरसुद्धा १०० पर्यंत असल्याने ताटातून वरणही आऊट होत असल्याचे दिसत आहे. वास्तविक भाजीपाला महागला असून डाळींचे दर काही प्रमाणात उतरल्याचे व्यापारी सांगत आहेत. मात्र सर्वसामान्यांना परवडणारे दर आजही नसल्याने काय खावे असा प्रश्न पडतच आहे.
------------------------
१) डाळींचे दर (प्रती किलो)
हरभरा -७०
तूर - ९५
मूग -१००
उडीद - १२०
मसूर - ९०
२) भाजीपाल्याचे भाव (प्रती किलो)
बटाटा - २०
कांदा - ३०
टोमॅटो - ४०
काकडी - २०
कोथिंबीर - १६०
पालक - ६०
मेथी - ८०
दोडके - ४०
लिंबू - ४०
गवार - ६०
-----------------------
म्हणून डाळ महागली...
आजघडीला सर्वच वस्तूंचे दर चढत असून त्यामागे पेट्रोल-डिझेल दरवाड कारणीभूत आहे. मागील वर्षभपारासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत चालले आहे. परिणामी प्रत्येकच वस्तूंच्या ट्रान्सपोर्टिंगचे दरसुद्धा तसेच वाढत चालले आहे. परिणामी महागाई वाढत चालली आहे. सध्या डाळींचे दर साधारण ५ रुपये दराने घसरल्याचे व्यापारी सांगत आहेत. मात्र आहे ते दर ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असून सर्वांच्याच खिशाला परवडणारे नाहीत.
------------------------
म्हणून भाजीपाला कडाडला
पावसाळ्यात साधारणत: शेतकरी भाजीपाला पीक घेत नाहीत. त्यामुळे भाज्यांचे उत्पादन कमी असते. शिवाय नागपूरवरून भाजीपाला येत असून पुरवठा कमी होत असल्यामुळे भाज्यांचे दर चढले आहे. त्यात पेट्रोल-डिझेलची दरवाढ यामुळे ट्रासपोर्ट खर्च वाढला असून या सर्वच बाबी महागाईसाठी कारणीभूत आहेत.
- राजू देशमुख
भाजी विक्रेता
--------------------------
भाज्यांचे दर कडाडल्याने भाज्या सोडून फोडणीच्या वरणावर चालवून घ्यायचो. मात्र आता डाळींचे जर १०० च्या घरात असून त्या सुद्धा आवाक्याबाहेर झाल्या आहेत. अशात सर्वसामान्यांनी काय खावे, असा प्रश्न पडत असून महागाई नियंत्रणात आणणे गरजेचे आहे.
- नेहा निनावे (गृहिणी)
----------------------------------
भाज्या एवढ्या महागल्या आहेत की त्यांचे दर ऐकूनच घाम फुटतो. त्यामुळे रोजच्या जेवणातून भाज्या गायबच झाल्या आहेत. त्यात महागाईमुळे डाळीही वधारल्या असून वरण-भात खाणेही खिशाला परवडणारे नाही. सर्वसामान्यांनी जगावे कसे, असा प्रश्न पडतो. शासनाने सर्वप्रथम महागाई नियंत्रणात आणावी.
- नितू ढोमणे (गृहिणी)