आधीच सिलिंडर हजाराच्या घरात ; घरपोचसाठी वेगळी लूट कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:33 AM2021-09-12T04:33:09+5:302021-09-12T04:33:09+5:30
कपिल केकत गोंदिया : मागील वर्षभरापासून सुरू असलेला महागाईचा भडका काही संपता संपेना असे झाले आहे. भाजीपाला असो की ...
कपिल केकत
गोंदिया : मागील वर्षभरापासून सुरू असलेला महागाईचा भडका काही संपता संपेना असे झाले आहे. भाजीपाला असो की किराणा सामान, वीजबिल असो की दैनंदिन गरजेच्या अन्य वस्तू सर्वांच्याच दरवाढीने खायचे काय व जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. यामध्ये अधिकची भर म्हणजे, आता घरगुती वापराचा गॅस सिलिंडर डोळे वटारत आहे. घरगुती वापराचा सिलिंडर आता ९५५ रुपयांपर्यंत पोहोचला असून, एकंदर हजार रुपयांच्या घरात आल्याने आता भल्याभल्यांना घाम फुटत आहे. अगोदरच सातत्याने वाढत असलेली प्रत्येक वस्तूची महागाई, त्यात आता सिलिंडर भडकल्याने अगोदरच भाजीपाला व किराणाचा प्रश्न सतावत असतानाच आता कसे शिजवावे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यातही गॅस सिलिंडर घेताना डोकेदुखीची बाब म्हणजे, ९५५ रुपयांचा हा सिलिंडर घेताना होम डिलिव्हरीच्या नावावर डिलिव्हरी बॉय १०-२० रुपये वरचे जोडून घेतो. अगोदरच सिलिंडरने डोळ्यात पाणी आणले असतानाच त्यात १०-२० रुपये वरचे देणे हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. मात्र, हा प्रकार सुरू असल्याने नागरिकांत रोष दिसून येतो. वरचे पैसे मागणे हे उचित नसून गॅस वितरकांकडूनही याचा विरोध आहे. मात्र, डिलिव्हरीच्या नावावर हा प्रकार सुरूच आहे.
--------------------------------
सध्याचा गॅस सिलिंडर दर - ९५५
शहरातील एकूण ग्राहक - ८५,०००
------------------------
वर्षभरात २०० रुपयांची वाढ
वर्षभरापूर्वी ७००-८०० रुपयांच्या घरात असलेला गॅस सिलिंडर बघता-बघता आता ९५५ रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षापासून पेट्रोल-डिझेलची सातत्याने दरवाढ सुरू झाली आहे व त्यामुळे सर्वच वस्तूंचे दर झपाट्याने वाढत चालले आहेत. यापासून सिलिंडरही सुटला नसून, वर्षभरात सुमारे २०० रुपयांची वाढ होऊन तो आता ९५५ रुपयांचा झाला आहे.
-----------------------------------
डिलिव्हरी बॉयला वेगळे २० रुपये कशासाठी?
गॅस सिलिंडरचे दर आता ९५५ रुपयांवर पोहोचल्याने सिलिंडर घेताना व वापरताना आता विचारच करावा लागतो. त्यातही घरी आणून दिल्यावर डिलिव्हरी बॉयला वरचे पैसे द्यावे लागतात. वरचे पैसे घेता येत नसल्याचे सांगितले जाते; मात्र तरीही हा प्रकार सुरूच आहे.
- ममता कावडे
---------------------------------
गॅस सिलिंडर ९५५ रुपयांचा असताना घरी आल्यावर डिलिव्हरी बॉय १०-२० रुपये वरचे जोडून पैसे मागतात. वरचे पैसे देण्याची गरज नसून, पावती जेवढ्याची तेवढेच पैसे द्यावे, हे माहिती आहे. मग हे पैसे कशाला मागितले जातात.
- रेखा इंगळे
------------------------------------
वितरक काय म्हणतात?
आम्ही आमच्या डिलिव्हरी बॉयला वरचे पैसे न घेण्याबाबत कडकपणे सांगितले आहे. मात्र, तरीही हा प्रकार होत असल्यास ग्राहकांनी एजन्सीत तक्रार करावी. शिवाय, ग्राहकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन पेमेंट करावे, जेणेकरून या प्रकारावर पूर्णपणे विराम लागणार.
- एक वितरक
----------------------------
होम डिलिव्हरीच्या नावावर पैसे घेता येत नाहीत. असे असल्याने ग्राहकांनी एजन्सीकडे तक्रार करावी, जेणे करून आम्हाला कारवाई करता येईल. तसेच नागरिकांनी ऑनलाईन पेमेंटवर जास्त भर द्यावा. असे झाल्यास तुमची स्लीप शून्य रकमेची निघणार व डिलिव्हरी बॉयला पैसे मागताच येणार नाही.
- एक वितरक