शाळा ऑफलाईन तरी शुल्क मात्र 100 टक्के, पालक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 05:00 AM2021-06-21T05:00:00+5:302021-06-21T05:00:01+5:30
शाळा ऑफलाईन तरी शुल्क का शंभर टक्के असा सवाल पालकांकडून केला जात आहे. शाळा संचालकांनासुध्दा कोरोनाचा फटका बसला, हे मान्य. मात्र, त्यांनी विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी वसूल न करता त्यात काही प्रमाणात सूट द्यावी, असा पालकांचा सूर आहे, तर खासगी शाळा संचालकांनुसार मागील दीड वर्षांपासून शाळा ऑनलाईन असल्या तरी शिक्षकांचे पगार, भाडे, वीजबिल आणि कर्मचाऱ्यांचे पगार नियमित करावेच लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालये सर्वच बंद आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. सरकारी असो वा खासगी शाळांनी मागील दीड वर्षांपासून ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू ठेवले आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे शाळांच्या खर्चात बरीच बचत झाली. मात्र, यानंतरही काही खासगी शाळांकडून पूर्ण फी वसूल केली जात आहे. तसेच फी भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावला जात आहे. त्यामुळे पालकांमधून रोष व्यक्त होत आहे. शाळा ऑफलाईन तरी शुल्क का शंभर टक्के असा सवाल पालकांकडून केला जात आहे. शाळा संचालकांनासुध्दा कोरोनाचा फटका बसला, हे मान्य. मात्र, त्यांनी विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी वसूल न करता त्यात काही प्रमाणात सूट द्यावी, असा पालकांचा सूर आहे, तर खासगी शाळा संचालकांनुसार मागील दीड वर्षांपासून शाळा ऑनलाईन असल्या तरी शिक्षकांचे पगार, भाडे, वीजबिल आणि कर्मचाऱ्यांचे पगार नियमित करावेच लागत आहे. त्यामुळे हा सर्व खर्च करावा लागत असून, अनेक पालकांनी मागील दीड वर्षांपासून फी भरली नाही. त्यामुळे शाळा संचालक अडचणीत आले असून, त्यांना सुध्दा कर्ज काढून गरज भागवावी लागत असल्याचे सांगितले.
शंभर टक्के फी कशासाठी ?
मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने शाळेत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांवरील खर्च कमी झाला आहे. मात्र, यानंतरही शाळांकडून शंभर टक्के फीसाठी तगादा लावला जात आहे. मात्र, शाळा संचालकांनीसुध्दा पालकांच्या परिस्थितीचा विचार करून फीमध्ये थोडी सवलत देण्याची गरज आहे.
- सुरेंद्र शर्मा, पालक
ऑनलाईन शिक्षणामुळे शाळांच्या विजेच्या आणि इतर खर्चातसुध्दा मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. तसेच शिक्षकांनासुध्दा पूर्ण पगार दिले जात नाही. पण, पालकांकडून मात्र शंभर टक्के फी घेतली जात आहे. ही बाब चुकीची असून, शाळा संचालकांनी फीमध्ये थोडी सवलत देण्याची गरज आहे.
- कविता मेंढे, पालक
शाळा ऑनलाईन असल्या तरी खर्च येतोच
मागील वर्षी मार्च महिन्यापासूनच शाळा बंद आहेत. त्यामुळे मागील वर्षीचे शैक्षणिक शुल्क अनेक पालकांनी भरले नाही. दीड वर्षांपासून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पगार, वीजबिल, भाडे आणि इतर आस्थापनांवरील खर्च संस्था चालकांना स्वत:च्या खिशातूनच करावा लागत आहे. यामुळे अनेकांना तर कर्ज काढावे लागले. त्यामुळे शाळा ऑनलाईन असल्या तरी खर्च हा सुरूच आहे.
- अनिल मंत्री, संस्था चालक
दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरूच आहे. यासाठी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना नियमित वेतन द्यावे लागत आहे. तर इतर खर्चसुद्धा सुरूच आहेत. त्यामुळे शाळा ऑफलाईन असल्या तरी खर्च मात्र सुरूच आहे. बऱ्याच शाळांनी पालकांना फी भरण्यासाठी सवलत दिली आहे. पालकांनीसुद्धा संस्थाचालकांची अडचण लक्षात घ्यावी.
- मुकेश अग्रवाल, संस्था चालक.
ऑनलाईन शाळांमुळे खर्चात बचतच
- शाळा ऑनलाईन असल्याने विजेच्या तसेच इतर सोयी सुविधांवरील खर्चात बचत झाली आहे.
- ऑनलाईन शिकविणाऱ्या शिक्षकांना केवळ अर्धा पगार दिले जात आहे.
- स्कूल बसेस बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे कपात करण्यात आले आहेत.
- प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यावर होणाऱ्या विविध खर्चाचीसुध्दा बचत झाली.