आमगाववासीय चार दिवसांपासून तहानलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 08:37 PM2017-12-07T20:37:12+5:302017-12-07T20:37:41+5:30
आमगाव शहराला मागील चार दिवसांपासून पिण्याचा पाण्याचा पुरवठा ठप्प आहे. परिणामी शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
आॅनलाईन लोकमत
आमगाव : आमगाव शहराला मागील चार दिवसांपासून पिण्याचा पाण्याचा पुरवठा ठप्प आहे. परिणामी शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरवासीय तहानलेले असताना प्रशासनाने मात्र यावर कुठलीही उपाययोजना केलेली नाही.
आमगाव येथे सध्या नगरपरिषद निवडणुकीवरुन राजकीय वातावरण तापले आहे. सर्वोच्य न्यायालयाने आमगाव नगर परिषद निवडणुक रद्दच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे राजकीय पुढारी आणि प्रशासन सुध्दा याच कामात व्यस्त आहे. परिणामी शहरवासीयांच्या समस्यांकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. आमगाव येथे चार दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असून त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे नागरिकांत तीव्र असंतोष आहे. सामन्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यासाठी नगर परिषद संघर्ष समिती शिवाय कुणीही राजकीय पुढारी अथवा स्थानिक लोकप्रतिनिधी पुढे आले नाहीत. त्यामुळे शहरवासीयांची समस्या अद्यापही कायम आहे. नगर परिषद निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय नेते व्यस्त असल्याचे चित्र आहे. त्यांना नागरिकांच्या प्रश्नांशी काही घेणे देणे नाही. आमगाव शहराला बनगाव पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या चार दिवसांपासून अचानक पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. मात्र त्या मागील कारणाचा शोध घेवून पाणी पुरवठा सुरळीत करण्याठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचे चित्र शहरात आहे. त्यामुळे नागरिकांनी यासर्व प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.
मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष
शहरातील शौचालयाचा प्रश्न, घरकुलांची समस्या, जमीन हक्काचा प्रश्न, सांडपाणी, रस्ते, पिण्याच्या पाण्याचे नियोजन व पुर्ततेचा प्रश्न असे अनेक प्रश्नांवर राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी गप्प असल्याने शहरवासीयांच्या समस्या अद्यापही कायम आहे.
पाणी पुरवठा सयंत्रामधील व्हॉल्व खराब झाल्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे. ते बदलण्यासाठी काम सुरू आहे. पुढील काही दिवसांत पाणी पुरवठा पूर्ववत होईल.
-साहेबराव राठोड,
प्रशासक तथा तहसीलदार, आमगाव