आमगाव धोक्यात, तर सालेकसा कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:28 AM2021-03-08T04:28:02+5:302021-03-08T04:28:02+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिकाधिक घट्ट होत असतानाच रविवारी (दि. ७) मात्र थोडाफार दिलासा देणारे आकडे हाती आले. ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिकाधिक घट्ट होत असतानाच रविवारी (दि. ७) मात्र थोडाफार दिलासा देणारे आकडे हाती आले. यामध्ये सालेकसा तालुका कोरोनामुक्त झाल्याचे दिसून आले. मात्र, दुसरीकडे आमगाव तालुक्यात आता कोरोना आपले पाय पसरताना दिसून येत आहे. आमगाव तालुक्यात रविवारी १२ क्रियाशील रुग्ण होते व त्यामुळे तालुका क्रियाशील रुग्णांच्या आकडेवारीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
मध्यंतरी चार-पाच तालुके कोरोनामुक्त झाले असतानाच पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढले व त्यामुळे कोरोनामुक्त झालेले तालुके पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या यादीत आले आहेत. शिवाय मोजक्या ५० च्या आत आलेली क्रियाशील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढली व आजघडीला जिल्ह्यात १६० क्रियाशील रुग्णांवर जाऊन पोहोचली आहे. विशेष म्हणजे, गोंदिया तालुका सुरुवातीपासूनच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. हेच कारण आहे की, बाधित व क्रियाशील रुग्णांच्या यादीत तालुका सुरुवातीपासूनच अग्रेसर आहे. रविवारीही गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ११३ क्रियाशील रुग्ण होते. अशात दिलासा देणारी बाब म्हणजे, सालेकसा तालुका कोरोनामुक्त झाला. मात्र, एकीकडे सालेकसा तालुका कोरोनामुक्त होत दिलासा देत असतानाच आमगाव तालुक्यात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. आमगाव तालुका बाधितांच्या यादीत जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर असतानाच क्रियाशील रुग्णांच्या यादीत मात्र आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. आमगाव तालुक्यात गोंदिया तालुक्यानंतर सर्वाधिक १२ रुग्ण आहेत. अशात दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट असलेल्या तिरोडा तालुक्यालाही आमगाव तालुक्याने मागे टाकल्याचे दिसत आहे. मात्र, हा प्रकार धोकादायक दिसून येत आहे.
-------------------------
आता खऱ्या अर्थाने गांभीर्याने घेण्याची गरज
राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढतच चालला असून, काही जिल्ह्यांतील स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. यामुळे आता त्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. अशात गोंदिया जिल्ह्याला हे बघून आता अधिकाधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.