आमगाव तालुका बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 05:00 AM2020-12-21T05:00:00+5:302020-12-21T05:00:07+5:30
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या बघावयाची झाल्यास गोंदिया तालुका प्रथम क्रमांकावर असून ७४०८ बाधितांची संख्या आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर तिरोडा तालुका असून १३२४ बाधितांची संख्या आहे. अशातच मात्र आमगाव तालुक्याची बाधितांच्या संख्येत आगेकूच दिसून येत आहे. आमगाव तालुका आजघडीला तिसऱ्या क्रमांकावर असून ११९६ एवढी तालुक्यातील बाधितांची संख्या आहे. विशेष म्हणजे, दिवाळी नंतर कोरोनाचा उद्रेक कमी झाला असतानाच बाधितांची संख्या सातत्याने कमी-जास्त होताना दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरूवातीपासून गोंदिया तालुका प्रथम तर तिरोडा तालुका व्दितीय क्रमांकाचे हॉटस्पॉट होत व ते आजही कायम आहे. मात्र मागील काही दिवसांपासून यामध्ये परिवर्तन दिसून येत असून आता आमगाव तालुक्यात नवीन बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. तर क्रियाशील रूग्ण संख्येतही आमगाव तालुका दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. यामुळे आमगाव तालुका हॉटस्पॉट बनतोय असेच काहीसे वाटू लागले आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या बघावयाची झाल्यास गोंदिया तालुका प्रथम क्रमांकावर असून ७४०८ बाधितांची संख्या आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर तिरोडा तालुका असून १३२४ बाधितांची संख्या आहे. अशातच मात्र आमगाव तालुक्याची बाधितांच्या संख्येत आगेकूच दिसून येत आहे. आमगाव तालुका आजघडीला तिसऱ्या क्रमांकावर असून ११९६ एवढी तालुक्यातील बाधितांची संख्या आहे. विशेष म्हणजे, दिवाळी नंतर कोरोनाचा उद्रेक कमी झाला असतानाच बाधितांची संख्या सातत्याने कमी-जास्त होताना दिसत आहे. अशात मात्र आमगाव तालुक्यात गोंदिया व तिरोडा तालुक्याला मागे टाकत बाधितांची संख्या वाढलेली दिसत आहे.
शुक्रवारची (दि.१८) आकडेवारी बघितल्यास जिलह्यात ४७ बाधित आढळून आले होते व त्यात सर्वाधिक १७ रूग्ण आमगाव तालुक्यातील होते. शनिवारीही (दि.१९) जिल्ह्यात ३७ बाधित आढळून आले होते व त्यात सर्वाधिक १५ रूग्ण आमगाव तालुक्यातील होते. यामुळे आता आमगाव तालुक्यातील बाधितांची संख्या ११९६ एवढी झाली असून तालुका तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. येथे तिरोडा व आमगाव तालुक्यातील बाधितांची संख्या बघितल्यास १२८ रूग्णांचाच फरक उरला आहे. अशात ज्या गतीने आमगाव तालुक्यात बाधितांची संख्या वाढत आहे त्यानुसार आमगाव तालुका दुसऱ्या क्रमांकावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच, यावरून आमगहाव तालुका हॉटस्पॉट बनत असल्याचे दिसून येत आहे.
आमगाव तालुक्यात ४४ क्रियाशील रूग्ण
जिल्ह्यातील शनिवारपर्यंतची आकडेवारी बघितल्यास ३०९ रूग्ण क्रियाशील होते. यामध्ये पहिल्या क्रमांकावर सर्वाधिक २०४ रूग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर आमगाव तालुका असून ४४ रूग्ण आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर तिरोडा तालुका असून तेथे २९ रूग्ण आहेत. म्हणजेच, आमगाव तालुका दुसऱ्या क्रमांकावर आला असून बाधितांच्या संख्येतही पुढे निघण्यास वेळ लागणार असे दिसून येते. मात्र हा प्रकार आमगाव तालुकावासीयांसाठी धोक्याचा आहे.
स्वयंशिस्तीचे पालन गरजेचे
ज्या झपाट्याने आमगाव तालुक्यात रूग्ण वाढत आहेत. त्यावरून आमगाव तालुक्यात कोरोनाकडे दुर्लक्ष केले जात असावे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र ही बाब फक्त आमगाव तालुकावासीयांसाठीच नव्हे तर अवघ्या जिल्हावासीयांसाठीही लक्ष देण्याची आहे. कोरोना आतापर्यंत गेले नसून मृतांची संख्या वाढत चालली असल्याने भीती असून संपलेली नाही. अशात नागरिकांनी अद्याप काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाने ठरवून दिलेल्या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाला हरविण्यासाठी श्वयंशिस्तीचे पालन करावेच लागणार आहे.